वांग्याच्या भरताला उद्योगाचे स्वरूप

वांग्याच्या भरताला उद्योगाचे स्वरूप
साधारण दोन दशकांपूर्वी 'स्पेशालिटी' म्हणून खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात वांग्याच्या भरताच्या पंगती व्हायच्या... बदलत्या काळात या पंगतींमध्ये सहभागी होणाऱ्या खवय्यांची संख्या वाढू लागली, पर्यायाने पंगतींचे प्रमाणही वाढू लागले. कालांतराने भरताची ओळख जळगाव जिल्ह्याबाहेर, अगदी खानदेशाबाहेरही होऊ लागली.. ब्रॅंडिंगअभावी भरताला राज्यभरात लोकप्रियता मिळू शकली नसली, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र भरीत प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटकच बनले आहे. त्यामुळे मागणी वाढल्यानंतर भरीत हॉटेलांमध्येही मिळू लागले. खानदेशात, विशेषतः जळगावात तर भरताच्या नावाने हॉटेलं सुरू झाली आहेत. अलीकडच्या काळात खानदेशी भरताला उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले. केवळ भरताच्या नावाने चालणारी दोनशेवर हॉटेलं आहेत.

जळगाव जिल्ह्यासह खानदेशात वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी अशा पाच महिन्यांच्या काळात जळगाव जिल्ह्यात भरताच्या हिरव्यागार वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. डिसेंबर- जानेवारी अशा दोन महिन्यांमध्ये भरताचा हंगाम जोरात असतो. सध्या हा हंगाम सुरू असून, ठिकठिकाणी 'भरीत पार्ट्या' रंगू लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात याद्वारे दररोज लाखोंची उलाढाल होत असते.

वांगे स्वस्त, भरीत महाग
गेल्या काही वर्षांत अगदी बाराही महिने वांग्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी या हंगामात वांग्याची जी चव लागते, ती इतर महिन्यांमध्ये लागत नाही. सध्या किरकोळ बाजारात वांग्याचा भाव दहा- पंधरा रुपये प्रतिकिलो आहे. पुरवठा कमी असला की हाच भाव चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत असतो. शेतकऱ्यांकडून मात्र अगदीच स्वस्तात म्हणजे पाच- दहा रुपये किलो दराने वांगी घेतली जातात. भरताची वांगी स्वस्तात मिळत असली, तरी हॉटेलमध्ये तयार भरीत शंभर- दीडशे रुपये किलोने मिळते.

व्यवसायाची 'चलती'
भरताच्या पार्ट्यांचे नियोजन करून देणारे काही केटरर्स जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. विशेषतः या हंगामात भरीत पार्ट्यांमधून कोट्यवधींची उलाढाल होत असते; मात्र भरताचे वांगे उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र पाच- दहा रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत नाही आणि त्याचा जेमतेम उत्पादन खर्च तेवढा निघतो, अशी स्थिती आहे.

हॉटेलमधील 'मेन्यू'
गेल्या दहा वर्षांत खानदेशी भरताचे चांगलेच ब्रॅंडिंग झाले आहे. घरगुती, नंतर मळ्यांमधील पार्ट्यांमध्ये होणारे भरीत आता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक हॉटेलातील मेन्यूकार्डवरील प्रमुख 'मेन्यू' बनले आहे. खानदेशातील पाहुण्यांना भरताचा पाहुणचारही केला जातो, हे विशेष.

असे बनते चमचमीत भरीत
वांग्यांना तेल लावून ते काड्यांवर भाजायचे, भाजल्यानंतर वांग्यांमधील गर काढून त्याला मिरच्या, कांदा व लसणाची पात, आले व लसणाची फोडणी द्यायची. वरून कोथिंबीर टाकायची, की झाले चमचमीत भरीत तयार. साधारण अशी असते भरताची रेसिपी. शेतमळ्यांमध्ये जाऊन भरीत पार्टी करण्याची मजाच वेगळी, म्हणून या दिवसांत 'भरीत पार्ट्या' चांगल्याच रंगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com