कुपोषणमुक्तीसाठी विटेकरांकडून ३० टन धान्य

कुपोषणमुक्तीसाठी विटेकरांकडून ३० टन धान्य

विटा -  महाराष्ट्रातील काही अादिवासीबहुल भागात कुपोषणामुळे दरवर्षी हजारो मुलांचा मृत्यू होतो. येथील ‘आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप’ने राबविलेल्या ‘घासातील एक घास कुपोषितांसाठी आणि निराधारांसाठी’ या उपक्रमाला विविध थरांतील घटकांनी धान्य रूपात मदत केली. सुमारे ३० टन धान्य संकलित झाले. ही मदत कुपोषणमुक्तीसाठी पाठवण्यात आली.  

आदिवासी भागात कुपोषणामुळे शेकडो बालकांसह लोकांचाही मृत्यू होत असल्याची खंत आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे सदस्य अमित भोसले, विकास जाधव, शीतल पुणेकर, माधव रोकडे, पांडुरंग पवार, मधुकर पाटील, मैनुद्दीन पठाण, जगन्नाथ पाटील, मुकेश जगताप, श्रीकांत कोरटे, विजय म्होपरे, इजाज मुल्ला, समीर शेख, गणेश गायकवाड, अनिल गायकवाड, संभाजी होगले यांच्या मनात होती. त्यातूनच कुपोषणमुक्तीसाठी धान्य संकलनाची कल्पना पुढे आली.

‘एक घर, एक किलो धान्य’ आणि ‘एक मंडळ अथवा संघटना दहा किलो धान्य’ असाही उपक्रम राबवण्याचा निर्धार झाला. शहरातील नागरिकांना आवाहन करून ‘आपल्या घासातला एक घास कुपोषित, निराधारांसाठी देऊया’ अशी साद घालण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बघताबघता या उपक्रमाची माहिती शहरभर पसरली. कोणी किलो तर कोणी पोत्याने धान्य दिले. शासकीय कार्यालये, नगरपालिका, पोलिस ठाणे, वकील, व्यापारी, नोकरदार, औषध विक्रेते अशा अनेक संघटना, सामान्य लोक, हातावर पोट असणारे, तृतीयपंथीयांनीसुद्धा धान्यरुपी मदतीचे बळ दिले.

शहरातील अनेक शाळांतून चिमुकल्या मुलांनी एक-एक मूठ धान्य जमा करीत खारीचा वाटा उचलला. एक किलो, एक पोते असे ३० टन धान्य संकलित झाले. जनतेने उपक्रमासाठी मनाची श्रीमंती दाखवत कुपोषित व निराधारांसाठी धान्य स्वरूपात मदत केली. हे काम महाराष्ट्राने दखल घ्यावी, असे आहे. आम्ही विटेकर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केवळ धान्य संकलनाचा संकल्प न करता उद्योग, व्यवसाय बाजूला ठेवून १५ दिवस अहोरात्र राबले. ‘आधी केले मग सांगितले’प्रमाणे ग्रुपने लोकसहभागातून उपक्रम यशस्वी करून दाखवला. संकलित झालेले सर्व ३० टन धान्य पालघरसह अन्य जिल्ह्यात आदिवासी भागातील ८०० कुटुंबांना वाटप करण्याचा सदस्यांचा मानस आहे.

ग्रुपच्या वतीने २१ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर या कालावधीत ‘घासातील एक घास कुपोषितांसाठी व निराधारांसाठी’ संकल्पना राबवण्यात आली. यास विटेकर जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवू. यापुढेही असेच निसर्गाप्रती आस्था, सामाजिक मूल्य जपणारे, एकोपा वाढवणारे, संवेदनशील असे उपक्रम राबवू.
- विकास जाधव, सदस्य, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com