रिक्षावाल्याचा मुलगा ‘वर्ल्ड कप’ खेळणार

रिक्षावाल्याचा मुलगा ‘वर्ल्ड कप’ खेळणार

कोल्हापूर - एका रिक्षावाल्याचा मुलगा जिद्दीने पेटला, की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून फुटबॉलपटू अनिकेत अनिल जाधव याच्याकडे पाहावे लागेल. सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली असून, त्याच्या कुटुंबीयांनी केलेले काबाडकष्ट लक्षात घेत तो भारतीय संघात आपले कौशल्य पणाला लावणार आहे. शाहूपुरी पाचव्या गल्लीत छोट्याशा घरात राहणाऱ्या अनिकेतच्या भारतीय संघात झालेल्या निवडीने कोल्हापूरकरांची मान उंचावली आहे. 

फुटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात फुटबॉलचे १३२ संघ, तर नोंदणीकृत खेळाडूंची संख्या २३९६ इतकी आहे. संतोष ट्रॉफीसह पुणे, मुंबईतील संघांत इथले खेळाडू खेळले आहेत; मात्र अनिकेतची फुटबॉलमधील भरारी अनोखी आहे.

छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारो खेळाडू खेळतात. आपण हे स्टेडियम भेदायचे हे ठरवूनच तो चौथीला असतानाच पुण्यातील क्रीडाप्रबोधिनीत दाखल झाला. तेथे त्याच्या फुटबॉलमधील कौशल्याला आकार मिळाला. सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेसाठी देशभरातून पन्नास खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात त्याचाही समावेश होता. स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाने जर्मनीत दौरा केला. या दौऱ्यात त्याने तब्बल सहा गोल केले. नॉर्वे व ब्राझीलच्या दौऱ्यातही त्याने आपली चुणूक दाखवली. त्याच्या या खेळाचे फुटबॉलप्रेमींनी कौतुक केले. त्यानंतर या फॉरवर्ड प्लेअरची भारतीय संघात निवड होणार का? याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष होते. नुकत्याच निवड झालेल्या भारतीय संघात त्याचा समावेश झाली आणि त्यांच्या रिक्षावाल्या वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला. 

अनिकेत फॉरवर्डमध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्याचा वेगवान खेळ, पायातील चपळता आणि प्रतिस्पर्ध्यांना चकवण्याचे कौशल्य वादातीत आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये निवड झालेला तो महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू असल्याने ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रमाच्या निमित्ताने त्याची छायाचित्रे राज्यात ठिकठिकाणी झळकली. आता तो ६ ते २९ ऑक्‍टोबरदरम्यान होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीच मैदानावर उतरणार आहे.

त्याचे वडील अनिल जाधव म्हणतात, ‘‘आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिकेतने फुटबॉलमध्ये खेळणे हेच आश्‍चर्यजनक आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे यांच्या पाठबळामुळेच तो आज भारतीय संघात खेळत आहे. त्यांचे सातत्याने त्याला प्रोत्साहन मिळत आहे. तो वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी उत्कृष्ट खेळ करेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.’’  

पैशासाठी जाहिरातीची ‘सर्कस’
जर्मनी, नॉर्वे, ब्राझील दौऱ्यावर जाण्यासाठी अनिकेतने रिक्षाचालक वडिलांकडे दहा हजार रुपये मागितले होते. इतके पैसे तातडीने देणे शक्‍य नसल्याने त्यांनी बॉम्बे सर्कसची जाहिरातीचे काम स्वीकारले होते. जाहिरातीतून पैसे अधिक मिळत असल्याने रिक्षातून सर्कसची जाहिरात केली. त्यातून मिळालेले पैसे त्यांनी अनिकेतला पाठविले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com