हृदयविकाराने हतबल संदीपला सीपीआरने बनविले तंदुरुस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात एकूण चार सर्जन व तीन हृदयविकार तज्ज्ञ आहेत. उपचारपूरक सर्व यंत्रसामग्री कार्यान्वित आहेत. बहुतेक शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून होतात. त्यामुळे गरजू घटकावर खर्चाचा बोजा पडत नाही. 
-  डॉ. जयप्रकाश रामनंद

कोल्हापूर - चार पावले चालले तरी संदीपला चक्कर येत होती. दवाखान्यात दाखविले. हृदयाच्या झडपेत जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. शस्त्रक्रिया व पूरक उपचारांचा खर्च अडीच लाखाच्या घरात सांगितला गेला. संदीपचे नातेवाईक हबकले. त्यांना कोणीतरी सीपीआरच्या हृदयक्रिया विभागात पाठविले. तिथे पुन्हा चाचण्या, निदान झाले. संदीपचा हृदयाच्या झडपात गंभीर जंतुसंसर्ग झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यास घेतले. तीन तासांत शस्त्रक्रिया यशस्वी झाली. संदीप पून्हा चालू-बोलू लागला. उपचाराचा सर्वच खर्च राजीव गांधी जीवनदायी योजनेतून झाला. संदीपला जगण्याचे नवे बळ लाभले, तसे सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील उपचार कौशल्य अधिक समृद्ध असल्याची बाब अधोरेखित झाली. 

सीपीआरचा हृदय शस्त्रक्रिया विभाग साधनसामग्री व डॉक्‍टरांची कमतरता अशा कारणांनी टीकेचा धनी बनला होता. हा विभाग बंद पडतो की काय अशी स्थिती होती. मात्र गेल्या दीड वर्षात राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने विशेष लक्ष देऊन हा विभाग पुन्हा सक्षम केला आहे. याठिकाणी दर महिन्याला तब्बल दहा हृदयशस्त्रक्रिया होतात. यातील बहुेतक सर्व शस्त्रक्रिया विविध शासकीय योजनांतून होत असल्याने हृदयरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर खर्चाचा भार पडत नाही.

संदीपच्या हृदयाला झालेला जंतुसंसर्ग, शुद्ध हरपणे व सतत उलटी अशी लक्षण दिसत होती. एक लाख हृदयरुग्णांमध्ये एखाद्याच व्यक्तीला इतक्‍या गंभीर स्वरूपाचा हृदयविकार होतो. तो शस्त्रक्रियेद्वारे दुरुस्त करताना ५० टक्के रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. तरी जोखमीची गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया सीपीआरचे डॉ. माजीद मुल्ला, डॉ. रणजित जाधव, डॉ. हेमलता देशमुख यांच्या पथकाने केली. संदीपच्या हदयातील झडपेत मेटल वॉल टाकला, झडप दुरस्त केली. त्यामुळे आयुष्यभरासाठीही झडप क्षमतेने काम करू शकणार आहे. संदीप रुग्णालयात आला तेव्हा दोन दिवस त्याची स्थिती गंभीर होती. औषधांनाही प्रतिसाद नव्हता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हृदयशस्त्रक्रिया विभागाने अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत हा विभाग सर्वसामान्य जनतेच्या उपचार सेवेसाठी सक्षम असल्याची साक्ष दिली आहे. 

Web Title: kolhapur news CPR sandeep