जांभुळणीत विठ्ठलभक्तीने गाडल्या जातीभेदाच्या भिंती

नागेश गायकवाड
सोमवार, 7 मे 2018

जांभुळणीतल्या पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला 24 वर्षांची परंपरा आहे. हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र येऊन तो करतात. वर्षभर गावात एकादशी आणि बारसला भजन होते.

आटपाडी - ' तुका म्हणे नाही जातीसवे, ज्या मुखी नाम तोचि धन्य', हे संत वचन सामाजिक समतेचे अधिष्ठान आहे. जांभूळणी येथे त्याचा प्रत्यय येतो. येथे विठ्ठल भक्तीने  हिंदू-मुस्लीम समाजातील जात धर्माच्या भेदाची  भिंत गाडली आहे. गावातील मुस्लिम धर्मीय गेली 24 वर्षे हरिनाम सप्ताहासह नियमित भजन, पंढरीच्या वारीत सहभागी होतात. नव्हे ही इथली परंपराच बनली आहे. गावकऱ्यांनी ही परंपरा जिवापाड जोपासली आहे. येथे जातीभेदाचे उदाहरण शोधूनही सापडत नाही. साऱ्या जगासमोर माणूसकीचा हा एकोपा आदर्शवत आहे.

जांभुळणीतल्या पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला 24 वर्षांची परंपरा आहे. हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र येऊन तो करतात. वर्षभर गावात एकादशी आणि बारसला भजन होते.

लियाकत मुलाणी तर घरातच एकादशीला भजन आयोजित करतात. भजनीमंडळात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम सहभागी होतात. ते हिंदूंसोबत सारेच सण करतात. केवळ आनंदाचे क्षणच नाही दु:खही वाटून घेतात. तर हिंदूही ईदसह साऱ्या सणात सहभागी होतात.

दृष्टीक्षेप - 

  • लोकसंख्या - 1350        
  • मुस्लिमांची घरे - 13    
  • मंदिर-मशिदीत अंतर 150 फूट.
  • एकत्रित हरिनाम सप्ताह 24 वर्षे.                   
  •  एकादशी आणि बारसला एकत्र भजन.          
  • तिर्थदर्शन सहलीत तेरा मुस्लीम कुटुंबांचा सहभाग.

                                    
सप्ताहात सहभागी होणारे मुस्लिम-
खाबुद्धीन मुलाणी,  इब्राहीम मुलांणी, वादक-सालिम मुलाणी. 
महाप्रसाद - लियाकत मुलाणी. मोफत स्पिकर-गुलाब मुलाणी.   फोटो व शूटिंग- नवाज मुलाणी. मोफत मंडप नवाज मुलाणी.

नवाज मुलांणी 50 वर्षे न चुकता पंढरीची वारी करतात. भजन, हरिपाठ त्यांचे तोंडपाठ आहे. टाळ आणि मृदंगही ते वाजवतात.    

मुस्लीम दु:खात, हिंदू सुतकात

गावात हिंदू आणि मुस्लिमांत एकोपा आहे. दोन्ही समाज एकमेकांचे सण-उत्सव घराघरांत करतात. सुख-दुःखात सहभागी होतात. एकमेकांचे सुतकही पाळतात. यावर्षी पाडव्याला बाबालाल मुलाणी यांचे निधन झाले. हिंदूंनी गुढ्या उभा केल्या नाहीत.
                         
"लहानपणापासूनच भजन कीर्तनाची आवड आणि विठ्ठल भक्तीची ओढ लागली. आम्ही जातिभेद मानत नाही. डोक्यात माणुसकी आहे. जाती-धर्माचा विचारच येत नाही."

-खुदबुद्दीन मुलांणी

Web Title: Kolhapur News Jambhulni Hindu-Muslim Unity speical story