esakal | पंक्‍चर काढायला रात्री-अपरात्री हजर
sakal

बोलून बातमी शोधा

पंक्‍चर काढायला रात्री-अपरात्री हजर

पंक्‍चर काढायला रात्री-अपरात्री हजर

sakal_logo
By
सुधाकर काशीद

महामार्गावरचा देवदूत - रफिक शेख यांची पैशापलीकडची माणुसकी
कोल्हापूर - कोणाची मोटारसायकल पंक्‍चरसाठी किंवा कोठेही बंद पडली तर हा तिथे धावून जातो. पंक्‍चर काढून देतो, हे व्यवसाय म्हणून ठीक आहे; पण रात्री-अपरात्री कितीही वाजलेले असू देत, कितीही पाऊस पडत असू दे किंवा थंडीने सारा परिसर गारठलेला असू दे, याला कोणी फोन केला तर, नाही हे उत्तर त्याच्याकडून कधी येत नाही हे त्याचे वेगळेपण आहे. कारण अशी सेवा देणे हीच ईश्‍वराची सेवा आहे, अशी त्याची भावना आहे. 

नवरा, बायको, मुले मोटारसायकलवरून जात असतील आणि आडमार्गाला मोटारसायकल पंक्‍चर झाल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल किंवा रात्रीच्या वेळी मोटारसायकल पंक्‍चर झालेला मोटारसायकलस्वार एकटा कशा अवस्थेत उभा असेल, हा विचार त्याला स्वस्थ झोपूच देऊ शकत नाही. एखादा माणूस आपल्या आयुष्याकडे कशा वेगळ्या प्रकाराने पाहतो, याचे हे उदाहरण आहे. 

रफिक बाबालाल शेख ऊर्फ रफिकभाई या एका साध्या पंक्‍चरवाल्याची ही लाख मोलाची कथा आहे. वयाच्या पंधरा वर्षांपासून ते पंक्‍चरच्या एका दुकानात कामाला. पंक्‍चर ही तशी साधी बाब; पण ज्याच्या वाट्याला पंक्‍चर येते त्यालाच त्याची डोकेदुखी कळते. विशेषत: रात्री-अपरात्री किंवा आडमार्गाला पंक्‍चर झाले तर त्याची गंभीरता अधिक जाणवते. पंक्‍चर झालेल्या मोटारसायकलसोबत महिला, लहान मुले असतील तर त्यांचे खूपच हाल होते. 

या परिस्थितीत एखादा पंक्‍चरवाला वाटेल तेवढे पैसे पंक्‍चरसाठी आकारू शकतो किंवा मोटारसायकल ढकलत घेऊन या, असे सांगू शकतो; पण रफिकभाईला पंक्‍चर काढून मिळणाऱ्या पैशापेक्षा पंक्‍चर झालेल्या लोकांची अस्वस्थता अधिक भिडली व त्यांनी इस्लामपूर ते निपाणीपर्यंतच्या मार्गात रात्री-अपरात्री कोणाचीही मोटारसायकल बंद पडू दे, पंक्‍चर होऊ दे, स्वत: तेथे जाऊन सेवा देण्याची तयारी केली. त्यांनी महामार्गावर अंतराअंतरावर रोड डिव्हायडरवर संपर्कासाठी आपला मोबाईल क्रमांक ठळकपणे लिहिला आणि हा मोबाईल क्रमांक अनेकांना आधार ठरला आहे. 

रफिकभाईंना पंक्‍चर काढण्यासाठी दिवसा तर फोन येतातच; पण एक-दोन दिवसाआड रात्रीचेही फोन येतात. किती वाजले आहे ते न पाहता रफिकभाई आपल्या मोटारसायकलीवरून बाहेर पडतात. पाऊस असू दे, थंडी असू दे, जाग्यावर पोचतात. रात्री केलेल्या या कामाबद्दल फक्‍त २० रुपये जादा घेतात. 

रफिकभाईचा क्रमांक हायवे पोलिसांकडे आहे, ते देखील महामार्गावर कोणाची मोटारसायकल पंक्‍चर झाली असेल तर फोन करतात. या कामाबद्दल रफिकभाईंना खूप धावपळ करावी लागते. झोप अर्धवट सोडून जावे लागते; पण रफिकभाई या कामातून मिळणाऱ्या पैशापेक्षा एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपणाला मदत करायला मिळाली म्हणून समाधान मानतात. म्हटलं तर ते अडचणीत आलेल्याकडून एका पंक्‍चरला दोनशे रुपये आकारू शकतात; पण असा पैसा कधी मिळवायचा नसतो, असे ते नम्रतापूर्वक सांगतात. 

अनुभवाचा खजिनाच
रफिकभाईंच्याकडे अनुभवाचा खजिनाच आहे. एकदा भर पावसात कोगनोळीच्यापुढे एक मोटारसायकल पंक्‍चर झाली. मोटारसायकलवर पाठीमागे महिला व तिची दोन मुले होती. त्यांना महामार्गावर डिव्हायडरवर रफिकभाईंचा मोबाईल क्रमांक मिळाला, त्यांनी फोन केला. अर्ध्या तासात रफिकभाई तेथे गेले. त्यांनी पंक्‍चर काढले. फक्‍त ८० रुपये घेतले; पण त्या पुढचा प्रसंग असा की ज्यांची मोटारसायकल पंक्‍चर झाली होती ते अक्षरश: रफिकभाईंना देवदूत समजून पाया पडू लागले.

loading image