वृद्ध नागरिकाचे पासपोर्टचे काम दहा मिनिटांत पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

वयस्कर दाम्पत्याने अनुभवली खाकी वर्दीतील माणुसकी; शाहूपुरी ठाण्यातील कर्मचाऱ्यांची बांधिलकी

वयस्कर दाम्पत्याने अनुभवली खाकी वर्दीतील माणुसकी; शाहूपुरी ठाण्यातील कर्मचाऱ्यांची बांधिलकी

कोल्हापूर - ‘आजोबा, थोडा वेळ थांबा. तुमचे पासपोर्टचे काम पूर्ण करून देतो. तुमची प्रकृती ठीक नाही. तुम्ही खुर्चीवर निवांत बसा...’ असा सल्ला देत अवघ्या दहा मिनिटांत कामाची पूर्तता करून वयोवृद्ध नागरिकाला शाहूपुरी पोलिसांनी रिकामे केले. दरम्यान, पावसात आजोबांना बाहेर कसे न्यायचे, या विचाराने त्यांच्या सोबतची महिला नातेवाईक गडबडून गेली असताना पोलिसांनीच त्यांची अडचण हेरून क्षणाचाही विचार न करता स्वतःच रिक्षा थेट कार्यालयाच्या दारात आणली आणि आजोबांना रिक्षात बसवण्यापर्यंत आधार दिला. हे पाहून सोबतच्या महिला नातेवाइकानेही खाकी वर्दीतील माणुसकीला सलाम केला. 

शाहूपुरी पोलिस ठाण्यात पासपोर्टसाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या इतरांच्या तुलनेत अधिक असते. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवरील मोर्चाच्या बंदोबस्ताचा ताण येथील पोलिसांवर असतो. मात्र, त्यातूनही पासपोर्टचे काम वेळेत झाले पाहिजे असा पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांचा आग्रह आहे. त्यासाठी दर तीन महिन्यांनंतर पोलिस ठाण्यात एक शिबिर घेण्यास त्यांनी सुरवात केली. त्यातून एकाच दिवशी प्रलंबित कामे असणाऱ्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या कामाची पूर्तता केली जाते.

दरम्यान, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पासपोर्टचे काम ७२ तासांत झाले पाहिजे, असे आदेश दिले. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनीही कामाच्या पूर्ततेचा धडाका लावला. 

शनिवारी सकाळी पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या सूचनेनुसार गोपनीयचे पोलिस नाईक शिवाजी पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सचिन पाटील आणि विजय इंगळे यांनी ‘साळवी’ कुटुंबातील दोघांना पासपोर्ट कामासाठी बोलावून घेतले. त्यातील एका वयोवृद्ध व्यक्तीला काठीचा आधार घेतल्याशिवाय हालचाल करता येत नव्हती. पोलिसांनी त्यांना प्राधान्य देत आजोबांच्या स्वाक्षऱ्या त्यांच्या जागेवर जाऊन घेतल्या. काम झाल्यानंतर आजोबांना बाहेर नेण्याची कसरत महिला नातेवाईक करत असताना ‘आई तुम्ही थांबा,’ असे म्हणत पोलिसांनीच तातडीने रस्त्यावर जाऊन रिक्षा थांबवली. बंद असणारे प्रवेशद्वार खुले करून थेट कार्यालयाच्या दारापर्यंत रिक्षा आणली आणि आजोबांना मदतीचा हात देऊन रिक्षात बसवलेही. हे पाहून त्या महिलेच्या तोंडून फक्त ‘अजूनही पोलिसांच्यातील माणुसकी कायम आहे हे पाहून फार बर वाटलं,’ असे उद्‌गार बाहेर पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Passport work of old citizen completed in ten minutes