गाव करील ते राव काय करील...!

राजेंद्र वाघ
शनिवार, 27 मे 2017

पिंपोडे खुर्द ग्रामस्थांनी १३ दिवसांत खोदलेली विहीर पाण्याने तुडुंब
कोरेगाव - पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीविना अवघ्या १३ दिवसांत खोदलेली विहीर आज पाण्याने तुडुंब भरली आहे. त्यातून ‘गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय ग्रामस्थांनी दाखवून दिलेला आहे. टंचाईच्या काळात या गावाने मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्यातून घालून दिलेल्या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पिंपोडे खुर्द ग्रामस्थांनी १३ दिवसांत खोदलेली विहीर पाण्याने तुडुंब
कोरेगाव - पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीविना अवघ्या १३ दिवसांत खोदलेली विहीर आज पाण्याने तुडुंब भरली आहे. त्यातून ‘गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय ग्रामस्थांनी दाखवून दिलेला आहे. टंचाईच्या काळात या गावाने मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्यातून घालून दिलेल्या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टंचाईवरील उपाययोजनांसाठी सादर केलेल्या प्रस्तावांचा प्रवास संपतो, तेव्हा पावसाळा सुरू होतो आणि टंचाईदेखील संपलेली असते, या सार्वत्रिक अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपोडे खुर्द ग्रामस्थांनी हे धाडस करून त्यात यशही मिळवले आहे. वसना उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा पाझर लक्षात घेऊन विहिरीसाठी अचूक ठिकाण निवडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावाला मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची किमया साधली गेली आहे.

पिंपोडे खुर्द गावाला या वर्षी टंचाईची मोठी झळ बसली. सार्वजनिक विहिरीचे पाणी खालावल्यामुळे पाणीयोजनेवर परिणाम झाला. गेल्या महिन्यात वार्षिक यात्रेसाठी गावी आलेल्या मुंबईस्थित ग्रामस्थांचेही पाण्याविना हाल झाले. दरम्यान, टंचाईवरील उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतीने दोन नवीन बोअरची मागणी आणि सध्याच्या विहिरीच्या खोलीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. उन्हाळा शेवटच्या टप्प्यात आला, तरी प्रस्तावांच्या मंजुरीबाबत काहीच हालचाल नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने गावानेच कंबर कसली.

लोकसहभागातून नवीन विहीर खोदण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. गुरवाचा मोडा नावाच्या शिवारातील इसूर ओढ्यावरील माती बांधाच्या खाली विहिरीचे ठिकाण पक्के झाले. लोकवर्गणी गोळा होऊ लागली आणि खोदकामाला सुरवात झाली. अवघ्या १३ दिवसांत ३२ फूट खोल विहीर खोदण्यात आली. इसूर ओढ्याद्वारे माती बांधापर्यंत पोचणाऱ्या वसना उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या पाझरामुळे नवीन विहीर पाण्याने डबडबली आहे. सध्या विहिरीचे बांधकाम आणि विहिरीपासून गावाच्या साठवण टाकीपर्यंत एक हजार ८०० फूट पाइपलाइन, अशी कामे एकाच वेळी सुरू आहेत. विहीर खोदाईसह आतापर्यंतच्या कामांसाठी सुमारे सहा लाखांचा खर्च आला आहे.

लवकरच नळयोजनेद्वारे पाणी 
दरम्यान, विहिरी व वीज कनेक्‍शन, तसेच अनुषंगिक कामासाठी आणखी एक लाखाच्या अपेक्षित खर्चाचीही तरतूद गावाने ठेवली आहे. त्यामुळे लवकरच नवीन विहिरीचे मुबलक पाणी ग्रामस्थांना नळयोजनेद्वारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koregav news well digging by village people