प्राध्यापकाने केला मिरची लागवडीचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मी दररोज ‘ॲग्रोवन’ वाचतो. त्यामध्ये शेतीविषयक चांगली माहिती मिळते. नवनवीन भाजीपाला लागवडीचे प्रयोग केले आहेत. योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे.
-प्रा. सतीश मुदगडे, नळेगाव

नळेगाव - येथील एका प्राध्यापकाने वेगळ्यापद्धतीने केलेली मिरचीची लागवड पाहण्यासाठी शेतकऱ्याची गर्दी होत आहे. नळेगाव शिवार हा कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यावर्षी पावसाने ओढ धरल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे प्रयोगशील शेतीची गरज आहे. कमी पाण्यात, योग्य व्यवस्थापन करून येथील प्राध्यापक सतीश चन्नापा मुदगडे यांनी असा प्रयोग यशस्वी केला. ते महात्मा बसवेश्‍वर डी. फॉर्म महाविद्यालयात  ज्ञानदान करतात. नळेगाव येथे त्यांच्याकडे वडिलोपार्जित  १२ एकर शेती आहे. यामध्ये दीड एकरावर ज्वेलरी जातीची मिरची लागवड केली आहे. रानाची योग्य मशागत करून चार फुटांची सरी करून, मातीचा भोद तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरले. दीड फुटावर रोपाची लागवड केली. श्री. मुदगडे यांच्याकडे पाण्यासाठी दोन विंधन विहिरी आहेत. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचे नियोजन केले आहे. मिरचीसाठी जैविक खत व औषधांचा वापर केला आहे.

सध्या चांगली फळधारणा झाली असून यामधून २० टनांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. बाजारात ४० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. परिसरात मिरचीचा सर्वात चांगला व यशस्वी फड असल्याने वडवळ, आटोळा, लातूर शिरूर अनंतपाळ, चाकूर, मोहनाळ आदी गावांतील शेतकरी पाहण्यासाठी येत आहेत.

Web Title: latur news professor chilli cultivation