थंडीने कुडकुडणाऱ्यांना मिळाली मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

औरंगाबाद - पोटाची खळगी भरण्यासाठी लोहार समाजाची काही परप्रांतीय कुटुंबं औरंगाबादेत आली; पण येथेही दुष्काळ असल्याने चार पैसे मिळण्याऐवजी परिस्थितीने घावच घातले. फारसे ग्राहक नसल्याने उपासमारीची वेळ आली. अशातच कडाक्‍याच्या थंडीमुळे पालं ठोकून राहणाऱ्या या कागागिरांच्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच लायन्स क्‍लब ऑफ औरंगाबाद-गोल्ड व अग्रवाल युवा मंच यांनी त्यांना ब्लॅंकेट्‌स, मिठाई आणि आवश्‍यक कपड्यांचे वाटप केले.

यंदा चित्तोड (राज्यस्थान) आणि खांडवा (मध्यप्रदेश) येथे दुष्काळ आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी तेथील लोहार समाजाची काही कुटुंबं औरंगाबादेत आली. रस्त्याच्या कडेने पालं ठोकून याच ठिकाणी लोखंडी अवजारे, गरजेच्या वस्तू बनविण्याचे काम ते करीत आहेत; पण मराठवाड्यातही दुष्काळ असल्याने अपेक्षित अशी विक्री होत नसल्याने निर्मिती खर्चही निघणे अवघड झाले.

त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माम झाला.  त्यातच वाढत्या थंडीमुळे आरोग्याचा प्रश्‍नही उपस्थित झाला. यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकताच सामाजिक संघटनांनी त्यांना मदत केली. या वेळी अग्रवाल सभेचे सहसचिव जगदीश अग्रवाल, अग्रवाल युवा मंचचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, सहसचिव मुकेश अग्रवाल, कोषाध्यक्ष अमूल अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी अनिकेत अग्रवाल, अमित अग्रवाल, दीपक जैन, नवीन भारुका, अर्णव अग्रवाल उपस्थित होते.

वाढदिवसावरील खर्च टाळून मदत 
गार्गी उगले हिचा नववा वाढदिवस होता. ‘सकाळ’मधील वृत्त वाचून तिने या परप्रांतीयांना मदत करण्याची इच्छा पालकांकडे व्यक्त केली. आई वैशाली आणि वडील प्रसन्न यांनीही वाढदिवसावरील खर्चात कपात केली. शिवाय गार्गीने आपल्या पिग्गी बॅंकेतील सर्व रक्कम देऊ केली. त्यातून वीस ब्लॅंकेट्‌स आणि खाऊ घेऊन गार्गीने या परप्रांतीयांना मदत केली. यासाठी शारंग उगले, मृगांक लेंभे, अजय पाटणी, सुदेश चुडीवाल आणि अभिजित हिरप यांनी सहकार्य केले.

Web Title: Lohar Society Cold Blanket Sweet Help Motivation