कमी खर्चातील पाणीसाठ्याचे प्रात्यक्षिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

कमी खर्चाची मॉडेल्स...
विद्यार्थ्यांनी बनवलेली मॉडेल्स ही कमी खर्चाच्या प्रकल्पांची आहेत. जलसंवर्धनासाठी ते आवश्‍यक आहेत. यातील अनेक बाबी ग्रामस्थ आपल्या स्तरावर राबवू शकतात; मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी इच्छाशक्ती आणि मानसिकता महत्त्वाची असल्याचा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला आहे.

चिपळूण - जिल्ह्यातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात पाणीसाठा करून तिचा वापर करता येतो. याबाबत सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्‍निक सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी बंधारे, शोषखड्डे, डोंगर उतारावरील पाणीसाठा, चिरेखाणींचा जलसाठ्याकरीता वापर, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवणे, वाहत्या पाण्याचे जलव्यवस्थापन आदी विषयीचे मॉडेल्स तयार करून जलसंवर्धनाबाबत उत्तम जागृती केली आहे. जलसाहित्य संमेलन निमित्ताने सह्याद्री पॉलिटेक्‍निक सिव्हिलच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांत कमी खर्चात पाणी साठवणूक व जलव्यवस्थापनाचे १० मॉडेल्स तयार केली. येथील जलसाहित्य संमेलनात ती नागरिकांच्या माहितीसाठी मांडण्यात आली आहेत.

जिल्ह्यात पाणीसाठ्याकरिता कोट्यवधी खर्चाचे बंधारे उभारण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यात चिरेखाणी व दगडी खाणींची संख्या मोठी आहे. पाणी साठ्यासाठी या खाणींचा वापर केला जात नाही. या खाणींमध्ये भांडवलविरहित पाणीसाठा करता येतो, हे सह्याद्री पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. खाणीत पाणीसाठा केल्याने विहीर व भूजल पातळीत वाढ होण्यात मदत होते. कमी खर्चात समुद्राचे खारे पाणीही पिण्यायोग्य करता येते. कोकणातील भौगोलिक रचनेद्वारे वाहत्या पाण्याचे जलव्यवस्थापनाकरिता डोंगराखालील भागात बंधारा उभारून पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे, पावसाचे पाणी अडविण्यासाठी चर खोदणे, घरांच्या छतावर पाणी साठवणे, तसेच टाकीच्या माध्यमातून पाणी साठवणे,  विहिरींचे पुनर्भरण, बंधारे आणि खड्डे खोदून भूजल पातळी वाढवणे, इंजेक्‍शन वेल पाइपद्वारे भूजल पातळीत वाढ, शोषखड्ड्यातून पाणी निचरा, जोहाड (गावतळी), डोंगर उतारावरील पाणीसाठा करणे, धरणातील पाणी झिरपण्याची प्रक्रिया कमी करणे आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 

Web Title: Low cost water supply demonstration