esakal | लिहू लागलो, आम्ही वाचू लागलो
sakal

बोलून बातमी शोधा

लिहू लागलो, आम्ही वाचू लागलो

लिहू लागलो, आम्ही वाचू लागलो

sakal_logo
By
ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी - आपली मुली शिक्षण घेऊ शकतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा पालकांची मुले आज शिकू लागली आहेत. लिहू लागली आहेत. वाचू लागली आहेत. चित्रे रंगवू लागली आहेत. आपल्या स्वप्नांना बळ येत आहे, या आशेने विद्यार्थीही शिकवायला येऊ लागली आहेत.

रावेतमधील लक्ष्मीनगर येथे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी सेलेस्टियल सिटी लेडीज असोसिएशन व रॉबिनहूड आर्मी पिंपरी-चिंचवडतर्फे पाठशाला वर्ग सुरू करण्यात आला. सुरवातीस ही शाळा पदपथावर भरायची. याबाबत ५ डिसेंबर २०१७ रोजी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दाखल घेऊन एका बांधकाम व्यावसायिकाने शाळेसाठी शेड बांधून दिले. सुरवातीला २० विद्यार्थी शाळेत यायचे. अवघ्या महिन्याभरात विद्यार्थिसंख्या ५४ वर पोचली. आता परिसरातील वाड्यावस्तीतील मुलंही शाळेत येऊ लागली आहेत. या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांनी महापालिकेच्या शाळेत जावे यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मात्र, वस्तीत शिकवले तरच शिकण्याचा या मुलांचा व त्यांच्या पालकांचा कल आहे. आई-वडील कामावर गेल्यावर मुलांनी घर व लहान भावंडांना सांभाळावे, घरातील कामे करावीत अशी पालकांची अपेक्षा असते. हे लक्षात घेऊन तिथेच जाऊन शिकविण्याच्या उद्देशाला सफलता मिळू लागली आहे. ज्या मुलांना काहीही येत नव्हते, ती आज आत्मविश्‍वासाने लिहायला, वाचायला शिकली आहेत. 

या मुलांसाठी दर आठवड्याला विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. महिला सेलेस्टीयल सिटीच्या प्राजक्ता रुद्रवार म्हणाल्या, पाठशाळेत दररोजच्या अभ्यासाव्यतिरिक्त स्वसुरक्षिततेचे धडे मुलांना देण्यात येतात. यासाठी देहूरोड पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाची मदत झाली आहे. रस्त्यावर सुरू केलेल्या वर्गाला ‘सकाळ’मुळे पाठबळ मिळाले. अक्षरओळखही नसलेली मुले आज वाचताना, बोलताना पाहून खूप आनंद होतो.

loading image