दुधागिरी तांड्यावरील महिमा गाजवतेय ‘दंगल’

- शशिकांत जामगडे
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) - दंगल चित्रपटातील ‘गीता’ आपल्या भूमिकेने व अभिनयाने बॉक्‍स ऑफिसवर दंगल गाजवत आहे. असे असतानाच गीताच्या आयुष्यासारखी कहाणी असणारी पुसद तालुक्‍यातील दुधागिरी तांड्यावरची महिमासुद्धा दंगल गाजवतेय.

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) - दंगल चित्रपटातील ‘गीता’ आपल्या भूमिकेने व अभिनयाने बॉक्‍स ऑफिसवर दंगल गाजवत आहे. असे असतानाच गीताच्या आयुष्यासारखी कहाणी असणारी पुसद तालुक्‍यातील दुधागिरी तांड्यावरची महिमासुद्धा दंगल गाजवतेय.

पुसद येथे दरवर्षी ऐतिहासिक कुस्त्यांचे आयोजन केले जाते. येथील पूस नदीतीरावरील मुखरे बांधावर या कुस्त्या होत असल्याने ‘बांधावरची कुस्ती’ म्हणून ही स्पर्धा या भागात ओळखली जाते. या कुस्त्यांमध्ये यंदा याच भागातील १६ वर्षीय महिमा राठोड ही कुस्तीपटू सहभागी झाली. मुलींच्या कुस्तीवर आधारित ‘दंगल’ चित्रपट सध्या बॉक्‍स ऑफिसवर गाजत असताना महिमाला कुस्तीच्या फडात पाहून अनेकांना ‘दंगल’ चित्रपटाची आठवण झाली.

महिमाचे बालपण दुधागिरी तांड्यातच गेले. येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत ती शिकली व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने कुस्ती खेळायला सुरुवात केली. घराची बेताची परिस्थिती, ग्रामीण वातावरण, मुलीच्या कुस्तीला असलेला विरोध, तांत्रिक व योग्य मार्गदर्शनाचा व आवश्‍यक सोयी-सुविधांचा अभाव असला तरीही कुस्तीची जिद्द तिच्या मनात कायम होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात तिने प्रवेश घेतला. येथे तिला शालेय कुस्ती स्पर्धेत सहभागी होता आले. अन्‌ महिमाच्या कुस्तीला खऱ्याअर्थाने येथूनच सुरुवात झाली. १७ वर्षे वयोगटातील शालेय कुस्ती स्पर्धांमध्ये ती खेळत राहिली. तीन वेळा राज्यस्तरावर व दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली. राज्यस्तरावर सुवर्ण व राष्ट्रीयस्तरावर सिल्व्हरपदकही तिने मिळविले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक इतर परराज्यांतही तिने अनेकदा कुस्ती गाजविली. 

मुली व महिलांबरोबरच ती पुरुषांसोबतही कुस्तीत चार हात करायला मागे-पुढे पाहत नाही. पुसद येथे आता नुकत्याच पार पडलेल्या लाल मातीतील कुस्तीच्या खुल्या दंगलीत तिने वयाने, वजनाने व ताकदीने मोठ्या असणाऱ्या पुरुष मल्लांसोबत कुस्ती खेळून त्याला अवघ्या पाच मिनिटांत धूळ चारली. महिमाचा हा खेळ पाहून उपस्थित कुस्तीशौकिनांनी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. महिमाच्या या कुस्तीच्या प्रवासात तिचे वडील राजू दाजिबा राठोड, कोषटवार विद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षक अविनाश जाधव यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

कुस्तीच्या वैभवासाठी शासनाने भौतिक सुविधांसह अत्याधुनिक कुस्तीचे आखाडे, मट, मुली व महिला खेळाडूंसाठी आवश्‍यक असणारा डमी खेळाडू आदी सुविधा पुरविणे गरजेचे आहे’.
- नाना बेले, जिल्हाध्यक्ष, कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र महासंघ, यवतमाळ.

महिमाचा खेळ उत्कृष्ट असूनही घरची बेताची परिस्थिती असल्याने यापुढे तिला खेळविणे कठीण झाले आहे. शिवाय, योग्य व तांत्रिक मार्गदर्शनासाठी उच्चदर्जाचे प्रशिक्षक असल्यास ती पुढील अनेक स्पर्धा जिंकू शकते.
- राजू दाजिबा राठोड, वडील 

Web Title: mahima rathod wrestling player