पालावरील तीन मुलींना करणार शैक्षणिक मदत - प्रकाश सोळंके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

माजलगाव - केसापुरी वसाहत परिसरात तीन कुपोषित बालके आढळल्यानंतर या कुटुंबातील तीन मुलींना शैक्षणिक मदत करण्याबरोबरच कुटुंबीयांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी शनिवारी (ता. १५) पालावर भेटीदरम्यान सांगितले. 

आरोग्य व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत, तर तीन बालके कुपोषित आढळली आहेत. 

शनिवारी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पालावर भेट देऊन संबंधित कुटुंबीयांची विचारपूस केली. शिक्षण घेत असलेल्या पंचशीला मालुजी खरात (इयत्ता तिसरी), पायल कैलास खरात (इयत्ता चौथी), ऐश्‍वर्या सदाशिव खरात (इयत्ता तिसरी) या विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत करण्याचे आश्‍वासन श्री. सोळंके यांनी दिले. या मुलींना माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण शैक्षणिक साहित्य व शालेयपयोगी आवश्‍यक त्या सर्व सोयी देण्यात येणार असून त्यांना एक वर्षांसाठी दत्तक घेणार असल्याचे श्री. सोळंके यांनी सांगितले. या कुटुंबीयांचे सातत्याने होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी पंचायत समितीकडून घरकुल मिळवून देणार असल्याचेही माजी मंत्री सोळंके यांनी सांगितले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, दयानंद स्वामी, कचरू खळगे, तालुकाध्यक्ष भीमकराव हाडुळे, भगवान कदम, विजय शिनगारे, टी. आर. जावळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: majalgav marathwada news education help to three girls on slum