सोसायटीत कचऱ्यापासून खतनिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. आजूबाजूच्या सर्व सोसायटींनी असा प्रयोग केला तर क्षेपणभूमीचा मुद्दाच राहणार नाही. प्रदूषणालाही आळा बसेल. सध्या प्रकल्पासाठी लागणारे ड्रम टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात येत आहेत. 
- वसंत देवरे (अध्यक्ष, शिवालय सोसायटी) 

दादर - दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे मुंबई महापालिकेसमोर गंभीर समस्या बनली आहे. पालिकेकडून त्यासाठी प्रयत्न होत असले तरी अपेक्षित यश मिळत नाही. कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचाही पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरळीतील शिवालय सोसायटीने कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प सोसायटीच्या आवारात सुरू करून पर्यावरणपूरकतेचा वसा घेतला आहे. 

वरळीत एसआरए प्रकल्पातून उभारण्यात आलेल्या शिवालय सोसायटीने दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर स्वत:च तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. सोसायटीचे सेक्रेटरी नितीन आडिवडेकर यांनी सोसायटीत कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणपूरक उपक्रमासाठी सोसायटीतील सर्वच रहिवाशांनी पुढाकार घेतला. त्यातूनच सोसायटीत 1 मेपासून कचऱ्यापासून खतनिर्मिती बनवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली. आता दिवाळीपर्यंत सोसायटीमध्ये सौरऊर्जेचे पॅनल बसवण्याचा रहिवाशांचा मानस आहे. स्थानिक नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सोसायटीच्या प्रयोगात आपलाही हातभार लागावा म्हणून सोसायटीला नगरसेवक निधीतून कचऱ्याचे डबे दिले आहेत. 

शिवालय सोसायटीत सातत्याने विविध प्रयोग राबवले जातात. सोसायटीत स्वतंत्र बोअरवेल आहे. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठीचा महापालिकेचा अधिकृत परवाना सोसायटीकडे आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्यानंतर सोसायटीच्या गच्चीत फुलझाडांची सुंदर बाग फुलली आहे. प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येणाऱ्या अनेकांचे लक्ष ती वेधून घेत आहे. प्रकल्पामुळे 25 दिवसांत 50 किलो खतनिर्मिती होते. सध्या हे खत सोसायटीतील उद्यानात वापरले जाते. मागेल त्यांच्या झाडांना ते गरजेप्रमाणे दिले जाणार आहे. या खतामध्ये कोणतेही रसायन नसल्याची माहिती सोसायटीचे सदस्य विशाल लोकरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manufacturing of fertilizer from the wastes in the Society