आईच्या स्मरणार्थ 'एक मित्र एक वृक्ष' संकल्पना

रमेश वत्रे
शुक्रवार, 28 जुलै 2017

प्रशांत व त्याचे मित्र पंधरा दिवसातून एकदा झाडांना पाणी देतात. त्यामुळे 99 टक्के झाडे जगली आहेत. वृक्षारोपणात देशी झाडे लावण्यावर भर असतो. यात वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, निलमोहर, आपटा, बहावा, नारळ, चिंच अशा झाडांचा समावेश आहे. लावलेली बहुतांश झाडे सुमारे पाच फुट उंचीची व मजबूत असतात.  

केडगाव (ता.दौंड) : केडगाव येथील किराणा दुकानदार प्रशांत सुगंधीलाल मुथा याने त्याने आईच्या स्मरणार्थ 'एक मित्र एक वृक्ष' ही संकल्पना राबविली. गेल्या दोन वर्षात त्यांनी सुमारे 300 रोपे लावली आहेत.

प्रशांतची आई मंगलबाई यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. मुथा परिवारासाठी हा मोठा धक्का होता. या दुःखातून सावरून प्रशांत व त्याच्या वडिलांनी मंगलबाईंचे नेत्रदान केले. एवढयावर न थांबता प्रशांत यांनी गेल्या दोन वर्षात केडगावातील आठ जणांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात पुढाकार घेतला. या कामात प्रशांतला नेत्रतज्ज्ञ डॅा प्रेमकुमार भट्टड यांची साथ मिळाली.

नेत्रदानाबरोबर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन झाले पाहिजे, या विचाराने त्यांनी 'एक मित्र, एक वृक्ष' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले. मित्रांच्या वाढदिवसाला सार्वजनिक ठिकाणी झाडे लावायला सुरवात केली. मित्राला पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्याला या उपक्रमात सहभागी करून घेतले. या उपक्रमात स्थानिक नागरिक असल्याने त्यांच्याकडून झाडांचे संरक्षण, ट्री गार्ड, पाणी यासाठी मदत होते. 'एक मित्र, एक वृक्ष' ही संकल्पना असली तरी प्रत्येक वाढदिवसाला 4-5 झाडे लावली जातात.

प्रशांत व त्याचे मित्र पंधरा दिवसातून एकदा झाडांना पाणी देतात. त्यामुळे 99 टक्के झाडे जगली आहेत. वृक्षारोपणात देशी झाडे लावण्यावर भर असतो. यात वड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, निलमोहर, आपटा, बहावा, नारळ, चिंच अशा झाडांचा समावेश आहे. लावलेली बहुतांश झाडे सुमारे पाच फुट उंचीची व मजबूत असतात.   

प्रशांतचे मित्र डॉ. श्रीवल्लभ अवचट हेसुद्धा या मोहिमेत सहभागी असून झाडे लावताना आयुर्वेदातील कोणत्या झाडाचे काय महत्त्व आहे, याची माहिती ते ग्रामस्थांना सांगतात. दानशूर व्यक्तिंकडून ट्री गार्ड घेऊन ती झाडांना बसविली जातात. पाणी व ट्री गार्ड यावर जातीने लक्ष असल्याने झाडांचे संगोपन चांगले होते. झाडे लावताना त्यात खत, काळी माती व झाडांच्या पांढ-या मुळया वेगाने फुटण्यासाठी लागणारे रासायनिक औषधे टाकली जातात.        

''वृक्षारोपणात ट्री गार्डचा खर्च मोठा असतो. ट्री गार्ड असेल तर झाडांचे संगोपन चांगले होते. स्वतःचा, मुलांच्या वाढदिवसाला किंवा आई वडिलांच्या स्मरणार्थ नागरिकांनी आम्हाला किमान एक ट्री गार्ड दिले तर त्यांचे नावाने आम्ही झाड लावू'' असे आवाहन प्रशांत मुथा यांनी केले आहे. झाडे किंवा ट्री गार्डसाठी 9834563131 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: marahti news positive news pune news Prashant Mutha