आदिवासींना मिळाली रोजगाराची नवी वाट

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

ठाणे - प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने नागरिक कागदी, कापडी आणि ज्युटच्या पिशव्या वापरण्यावर भर देत आहेत. याच पिशव्या आकर्षक रंगात आणि चित्रात सजलेल्या मिळाल्यास त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून येऊर-जांभूळपाडा भागातील आदिवासींनी यातूनच रोजगाराची नवी वाट शोधली आहे. वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून जांभूळपाडा येथील आदिवासी या पिशव्या रंगवण्याचे काम करत असून, व्यावसायिकही वेगवेगळ्या मागणीनुसार या आदिवासींची मदत घेत आहेत. जांभूळपाडा हा भाग तसा दुर्लक्षित असून, या नव्या उद्योगामुळे येथील आदिवासींना रोजगाराची दालने खुली झाली आहेत. 

ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊर येथील जांभूळपाडा हा आदिवासी पाडा अद्यापही दुर्लक्षितच आहे. जांभूळपाडा परिसरात साधारण ४० घरांमध्ये २०० ग्रामस्थ राहतात. येऊर परिसरातील रस्त्याला लागून असलेल्या बंगल्यांना, हॉटेल्सना सर्व सोई-सुविधा मिळत असतानाही या पाड्यावरील नागरिक मात्र आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून या पाड्यावर प्री-प्रायमरी स्कूल म्हणजेच बालवाडी चालवण्यात येते. विविध उपक्रम पाड्यावर घेतले जातात. या उपक्रमात पाड्यावरील आदिवासीही उत्साहाने सहभागी होतात. 

चित्रकला, नृत्य या येथील लोकांच्या आवडत्या गोष्टी असून, चित्रकला उपक्रमांतर्गत संस्थेने पिशव्यांवर आवडते चित्र रेखाटा, असा उपक्रम दिवाळीत राबवला होता. या वेळी शाळकरी मुले, काही आदिवासींनी रेसुंदर चित्रे खाटली होती. दिवाळीत विविध स्टॉलवर चित्र रेखाटलेल्या ३० पिशव्या मांडल्या. याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसादही दिला. मोठ्या संख्येने पिशव्यांची विक्री झाल्याचे वनवासी कल्याण आश्रमच्या सदस्या सुप्रिया शिर्के यांनी सांगितले. आदिवासींच्या चित्रांना मिळालेला प्रतिसाद पाहता हे रोजगाराचे साधन होऊ शकते, असा विचार डोक्‍यात आला, असेही सुप्रिया यांनी सांगितले. 

मिळणार खास प्रशिक्षण
सध्या पाड्यावरील मुलांच्या परीक्षांचा हंगाम असून, या दिवसांत पालकांचेही मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून काही काळासाठी आम्ही काम थांबवले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपतील. त्यानंतर पुन्हा या कामास नव्या जोमाने सुरुवात करण्यात येणार आहे. येथील आदिवासींना यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सुप्रिया शिर्के यांनी सांगितले. ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर हा पाडा असला तरी येथे सुविधा नाहीत. येथील आदिवासींना रोजगाराच्या संधी नाहीत. त्यांच्या अंगी असलेल्या कलेनुसार त्यांना आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. नागरिकांनीही त्यांच्या कलेला दाद देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची तयारी दर्शविल्याने आदिवासींनाही लघुउद्योगाची संधी निर्माण झाली आहे, असेही शिर्के यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news adivasi New way of employment paper bag cloth bag