वर ८० वर्षांचा, तर वधू ७५ वर्षांची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - लग्न काय असते, हे कळतही नव्हते तेव्हाच त्या दोघांचा बालविवाह झाला. त्यामुळे आपले लग्न नेमके कसे झाले, हे त्यांना आज आठवतही नाही. त्यांना आपल्या लग्नाचा आनंद घेता यावा, विस्मृतीत गेलेल्या स्मृतींना उजाळा मिळावा, या हेतूने त्यांच्या मुलाने अनोख्या पद्धतीने पुन्हा त्यांचे लग्न लावून दिले. हा आगळावेगळा विवाह सोहळा शहरातील म्हाडा कॉलनीत पार पडला. 

आपल्या आयुष्यातील ऐंशी कॅलेंडर पाहणारे रामराव किसनराव धस यांचा बालविवाह झाला होता. त्यावेळी ते केवळ अकरा वर्षांचे, तर त्यांच्या पत्नी पाच वर्षांच्या होत्या. त्यामुळे या दोघांना स्वतःचे लग्नच आठवत नाही. परिस्थिती तशी बेताचीच होती. शिक्षण झाल्यानंतर रामरावांनी एसटी महामंडळात नोकरी केली. अनेक ठिकाणी बदल्याही झाल्या. वर्ष १९९६ मध्ये एसटी महामंडळातून वाहतूक निरीक्षक म्हणून ते निवृत्त झाले. जनसंपर्काची शिदोरी पाठीशी घेऊन त्यांचा प्रवास सुरूच आहे. त्यांचा मुलगा राजू धस यांच्या मनात एक कल्पना आली. आपले वडील ८० वर्षांचे झाले. आई-बाबांचे पुन्हा एकदा लग्न लावावे, या विचारामध्ये म्हाडा कॉलनी येथील एकता मंचचे सदस्य, त्यांचा परिवार या सर्वांच्या विचाराने हा कार्यक्रम घडून आला. या आगळ्यावेगळ्या विवाहासोबत सहस्रचंद्र दर्शन पूजा करण्यात आली. या प्रसंगी धान्यतुला करून ते धान्य अनाथाश्रमात वाटप करण्यात आले. अतीश सोनुने, रवी सुराशे व प्रशांत मगरे यांनी सूत्रसंचालन केले. राजू धस यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aurangabad news old couple marriage