चार हजार सातशे जोडप्यांचा इज्तेमात सामुदायिक विवाह

दीपक जोशी
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

लिंबेजळगाव - औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमात रविवारी (ता. २५) दिल्ली येथील मौलाना सादसाहाब कांधिलवी यांच्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीत चार हजार सातशे जोडप्यांचा सामुदायिक विवाह झाला.

यानंतर सायंकाळी पाचची नमाज अदा करून दुवा मागण्यात आली. मौलाना सादसाहाब कांधिलवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लिंबेजळगाव - औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमात रविवारी (ता. २५) दिल्ली येथील मौलाना सादसाहाब कांधिलवी यांच्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीत चार हजार सातशे जोडप्यांचा सामुदायिक विवाह झाला.

यानंतर सायंकाळी पाचची नमाज अदा करून दुवा मागण्यात आली. मौलाना सादसाहाब कांधिलवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भाविकांचे जत्थे मोठ्या प्रमाणात सायंकाळी उशिरापर्यंत येत होते. सुरक्षा आणि शांततेसाठी ग्रामीण पोलिसांसह शहर पोलिसही ठिकठिकाणी तळ ठोकून आहेत. मुख्य महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी लाखो भाविक इज्तेमास्थळी दाखल झाल्याने मोठी जागा उपलब्ध असूनही ही जागा कमी पडल्याचे चित्र होते. सोमवारी अखेरच्या दिवशी दुवासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती संयोजक तथा सरपंच सय्यद अनिसभाई यांनी दिली.

अशोक चव्हाण यांची भेट
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी इज्तेमास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार कल्याण काळे आदी उपस्थित होते. संयोजक सोहेल मुल्ला यांनी अशोक चव्हाण यांना इज्तेमाबाबत माहिती दिली.

पिण्याच्या पाण्याची कमतरता
इज्तेमात रविवारी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता दिसून आली. पाणी मिळत नसल्याने काहीवेळ गोंधळ उडाला होता, याचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी पाण्याच्या बाटल्यांची चढ्या दराने विक्री केली.

पार्किंग व्यवस्था पडली कमी
इज्तेमास्थळी भाविकांची गैरसोय होऊ नये त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेक ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, भाविकांची वाढत्या संख्येमुळे इज्तेमापासून १५ किलोमीटर अंतरावर नवीन पार्किंग व्यवस्था करावी लागली. त्याठिकाणाहून भाविकांना इज्तेमास्थळी पायी यावे लागले. वाळूज ते लिंबेजळगावपर्यंत दोन्ही बाजूने भाविक पायी जाताना दिसत होते.

इज्तेमास्थळी जाण्यासाठी सात किलोमीटरची पायपीट
औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे सुरू असलेल्या इज्तेमासाठी दोन दिवसांपासून मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. इज्तेमाच्या पार्किंकस्थळी जागा शिल्लक नसल्याने रविवारी (ता.२५) दुपारनंतर तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील अंबेलोहळ रस्त्यावर इज्तेमापासून सात किलोमीटर अंतरावर वाहने थांबवून भाविकांना पायी जावे लागले. 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या इज्तेमाची सांगता सोमवारी (ता. २५) होणार आहे. या इज्तेमात राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक आल्याची माहिती संयोजकांनी दिली. इज्तेमासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुस्लिम बांधवांसह सर्व समाजातील नागरिक सहकार्य करीत आहेत. प्रत्येक विभाग नेमून दिल्याप्रमाणे सर्व जबाबदारी सांभाळत आहे. पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, स्वयंसेवक, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदी सर्व विभागांशी समन्वय साधून सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. या इज्तेमात दोन दिवसांपासून पाच हजार पोलिसांसह दहा हजारांहून अधिक स्वयंसेवक सुरक्षा आणि शिस्तीसाठी तैनात आहेत. या ठिकाणी दररोज बनविण्यात येणारे भोजन व इतर प्रासादिक अन्न सबंधित विभागाने चाचणी केल्यानंतरच भाविकांना देण्यात येत आहे. दहा वर्षांपूर्वी मालेगावला इज्तेमा घेण्यात आला होता; परंतु लिंबेजळगाव येथील इज्तेमा हा मालेगावच्या इज्तेमापेक्षा चारपटींनी मोठा ठरला असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.   मुस्लिम बांधवांनी या इज्तेमात स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. शंभर फुटांचे चार रस्ते तयार करण्यात आले असून यापैकी एक मुख्य रस्ताही १०९ फुटांचा करण्यात आलेला आहे. एवढा मोठा रस्ता असतानाही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: marathi news ijtemat community marriage