होळी लहान करू या, पोळी दान करू या..!

होळी लहान करू या, पोळी दान करू या..!

पाली : होळीनिमित्त 'होळी लहान करू या, पोळी दान करू या’ असे आवाहन महाराष्ट्र अंनिसने केले होते. पाली सुधागड शाखेला यंदा पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी ग्रुपची बहुमूल्य साथ मिळाली. लोकांनी या अावाहनाला उदंड प्रतिसाद दिला आणि होळीच्या रात्री गुरुवारी (ता.1) जवळपास ठिकठिकाणच्या होळयांजवळून अडीच हजारहून अधिक पोळ्या जमा झाल्या.

या सर्व पोळ्या अंनिस कार्यकर्ते व 'एक संघर्ष समाज सेवेसाठी' या ग्रुपच्या सदस्यांनी आज (शुक्रवार) सुधागड तालुक्यातील अादिवासीवाड्यांवर वाटून अादिवासी अाबालवृद्गांचे तोंड गोड केले.

’होळी लहान करू या, पोळी दान करू या’ या कार्यक्रमाच्या पाठीमागेसुद्धा राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे व पर्यावरणाचे प्रदूषण थांबविणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी सुधागड-पाली शाखेचे प्रधान सचिव अमित निंबाळकर तसेच निधी संकलन कार्यवाह  रोशन रुईकर अादी कार्यकर्त्यांनी पालीतील सर्व होळ्यांवर जावून ’होळी लहान करू या, पोळी दान करू या’ या अाशयाची पत्रके वाटली.

जळून जाणाऱ्या शेणी, एरंडाचा डहाळ यांची होळी केली जाते व पूजा करून होळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरण-पोळी भक्तिभावाने अर्पण करतात. जळून जाणारी पोळी आपल्या गरजू बांधवाला दिली तर त्याच्या पोटात पेटलेली भुकेची होळी शांत होईल व त्याचे खरे समाधान आपल्याला मिळेल. हे त्यांनी लोकांना समजावून सांगितले तसेच अंनिसचा हा संदेश 'सकाळ'मधूनही देण्यात आला होता.

या अावाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी बातमी वाचून अंनिसच्या कार्यकर्त्यांना फोन करुन पोळ्या नेण्यास सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष होळीच्या रात्री पाली-सुधागड अंनिस शाखेचे कार्यकर्ते व 'एक संघर्ष समाज सेवेसाठी' ग्रुपचे तरुण सदस्य सर्व होळ्यांवर फिरले अाणि पोळ्या जमा केल्या. काही होळयांवर तर चक्क पोळी होळीत अर्पण न करता दान करावी असे फलक लावून तेथे पोळी ठेवण्यासाठी खोका ठेवला होता.  अंनिसच्या या स्तुत्य उपक्रमाला 'एक संघर्ष समाज सेवेसाठी' ग्रुपची बहुमूल्य साथ मिळाल्याने हा उपक्रम खुप मोठा झाला. तसेच यामुळे अनेकांचे प्रबोधनदेखील झाले.

पालीतील बुरुडआळी, भोईआळी, कुंभारआळी, खडकआळी, कासार आळी, मधलीआळी, सोनारआळी, रामआळी, बेगरआळी,  बुरुमाळी, वरची आगरआळी, स्वामी समर्थ नगर, चर्मकारवाडा, बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर, मधली बाजारपेठ, गुरांच्या दवाखान्या मागील होळी, पिराचा माळ, उंबरवाडी, चव्हाण व भोसले यांची होळी, रासळवाडी, झाप, ओसवाल प्लाझा, खालची आळी, कटकरांची तसेच कमानी जवळची होळी आदी होळयांजवळून पोळ्या जमा करण्यात आल्या. लोकांनी स्वतःहुन पुढे येऊन पोळ्या दान केल्या.

अठराविश्वे दारिद्र असलेल्या अादिवसींना व त्यांच्या कुटूंबिय व लहानग्यांना होळीनिमित्त गोडधोड खायला मिळाले. होळीला पुरणपोळ्या खायला मिळाल्या याचा अानंद अंनिस कार्यकर्त्यांना त्यांनी बोलून दाखविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com