मैदानी खेळात लोकेशची भरारी

सागर शिंगटे
शुक्रवार, 9 मार्च 2018

पिंपरी - भोसरी येथील खंडोबामाळ परिसरातील बिगारी कुटुंबातील लोकेश राठोड याने अथक परिश्रमाच्या जोरावर मैदानी खेळात भरारी घेतली आहे. माजी धावपटू ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांचेही त्याला कर्नाटकात उंच उडी आणि तिहेरी उडीत मार्गदर्शन मिळत आहे. 

पिंपरी - भोसरी येथील खंडोबामाळ परिसरातील बिगारी कुटुंबातील लोकेश राठोड याने अथक परिश्रमाच्या जोरावर मैदानी खेळात भरारी घेतली आहे. माजी धावपटू ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांचेही त्याला कर्नाटकात उंच उडी आणि तिहेरी उडीत मार्गदर्शन मिळत आहे. 

उद्यमनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीत लोकेशने पाचवीपासून शिक्षण घेतले. सुरवातीपासूनच त्याचा उंचउडी, तिहेरीउडी आणि ८० मीटर, १०० मीटर अडथळा शर्यतीकडे त्याचा ओढा होता. त्यानुसार त्याचे प्रशिक्षक सोपान खोसे यांनी त्याला मूलभूत प्रशिक्षण दिले. २०१४ च्या फेडरेशन चषक स्पर्धेत त्याने १४ वर्षांखालील मुलांच्या उंचउडी प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याची दिल्ली येथे २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धापूर्व शिबिरासाठी निवड झाली. त्या वेळी लोकेश कर्नाटकातील प्रशिक्षकांच्या संपर्कात आला. खेळातील पुढील भवितव्य घडविण्यासाठी त्याने कर्नाटक सरकारच्या युवा सेवा आणि क्रीडा विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन याच विभागाच्या बंगळूर येथील स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये (डीवायईएस) प्रवेश घेतला. 

लोकेश म्हणाला, ‘‘सुरवातीला भाषेचा त्रास झाला. इतर सहकारी आणि प्रशिक्षकांशी इंग्रजीमधून संवाद साधत होतो. मागील सहा महिन्यांपासून बऱ्यापैकी कन्नड भाषा अवगत झाली आहे. इथे प्रवेश घेतल्यापासून माझ्यात खूप तांत्रिक सुधारणा झाली आहे. २ ते ३ महिन्यांत पी. टी. उषा क्‍लबला भेट देतात. त्यांचे मला तांत्रिक सुधारणाबद्दल मार्गदर्शन मिळाले. अगोदर मी उंचउडीत सहभागी होतो. परंतु, त्यात बदल करून आता तिहेरी उडीवर लक्ष केंद्रित केले आहे.’’

लोकेशचे जून २०१७ पासून प्रशिक्षण सुरू असून पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्याला क्‍लबमार्फत दत्तक घेण्यात आले आहे. लोकेशचे वडील दामू दगडू राठोड बिगारी काम करतात. आई त्यांना त्यासाठी मदत करते. त्याला दोन लहान बहिणी आहेत. 

खेळाबरोबरच शिक्षणही 
पतियाळा येथे एप्रिलमध्ये होणाऱ्या फेडरेशन चषक मैदानी स्पर्धेत खेळण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. त्याने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली आहे. 

लोकेशला आहे त्या क्रीडा सुविधांमध्ये प्रशिक्षण दिले. त्याची चांगल्या ठिकाणी निवड झाली असून माझ्या आणि त्याच्या कष्टाचेही चीज झाले आहे. त्याने पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळावे, अशी इच्छा आहे.
- सोपान खोसे,  ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक, क्रीडा प्रबोधिनी

Web Title: marathi news Lokesh Rathod story sports