नित्याच्या सफाईतून त्याच्या शिक्षणाला हातभार 

सुवर्णा चव्हाण
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे - रोज सकाळी सात वाजता मुसीन शेख सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात साफसफाईसाठी येतो. मोठ्या मेहनतीने आणि मन लावून काम करतो...त्याच्यामुळेच उद्यान स्वच्छ अन्‌ सुंदर दिसते. या स्वच्छतेमागे आहेत उद्यानात सकाळी व्यायामाला येणारे ज्येष्ठ नागरिक.

पुणे - रोज सकाळी सात वाजता मुसीन शेख सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात साफसफाईसाठी येतो. मोठ्या मेहनतीने आणि मन लावून काम करतो...त्याच्यामुळेच उद्यान स्वच्छ अन्‌ सुंदर दिसते. या स्वच्छतेमागे आहेत उद्यानात सकाळी व्यायामाला येणारे ज्येष्ठ नागरिक.

या ज्येष्ठ नागरिकांपैकी एक आहेत वास्तुविशारद प्रदीप पेठे. त्यांच्या प्रयत्नामुळेच मुसीनला उद्यानातील सफाई कामगार म्हणून नेमण्यात आले अन्‌ आज तो उद्यानातील साफसफाईचे काम नित्यनियमाने करत आहे. पेठे यांच्या प्रयत्नांनी मुसीनला रोजगारासह उच्च शिक्षण घेण्यासाठी चार पैशांचा आधारही मिळाला आहे. पेठे आणि त्यांच्यासारखे कित्येक ज्येष्ठ नागरिक सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान पु. ल. देशपांडे उद्यानात व्यायामाला जातात; परंतु व्यायामाला येणाऱ्या पेठे यांना उद्यानात मोठ्या प्रमाणात कचरा साठत असल्याचे दिसले. या कचऱ्यामुळे उद्यान परिसर अस्वच्छ होत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी ही बाब उद्यान प्रशासनाला आणि व्यायामाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सांगितली. चर्चेअंती उद्यानात सफाई कामगार नेमावा, ही कल्पना पुढे आली. पेठे यांच्या प्रयत्नातून आणि 

रोटरी क्‍लब ऑफ पुणे मिडइस्टच्या अध्यक्षा स्मिता पेठे यांच्या सहकार्याने मुसीनच्या कुटुंबीयांना उद्यानातील सफाईची जबाबदारी देण्यात आली. कुटुंबीयांनी महिन्यापासून साफसफाईसाठी मुसीनला उद्यानात पाठवायला सुरवात केली. सध्या दररोज मुसीन सकाळी सात ते आठ उद्यानाची सफाई करतो. रोज किमान अर्धा पोती कचरा साठतो; मात्र मुसीन हा आपली जबाबदारी चोखपणे बजावत असल्याचे पेठे सांगतात. या कामासाठी ‘रोटरी’कडून मुसीनला कपडे, हॅंडग्लोज इत्यादी साहित्य देण्यात आले आहे.

याबाबत पेठे म्हणाले, ‘‘उद्यानात रोज मोठ्या प्रमाणात कचरा साठायचा. त्यावर उपाय म्हणून आम्हीच सफाईसाठी व्यक्ती नेमण्याचे ठरविले. या उपक्रमाला ‘रोटरी’ची मदत मिळाली. मुसीन दहावीत शिकतो. तो आपले काम चोखपणे बजावतो. या कामामुळे त्याला आर्थिक मदतही झाली आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी हातभारही लागला. नित्याच्या साफसफाईमुळे उद्यान स्वच्छ आणि सुंदर झाले आहे.’’

Web Title: marathi news musin shaikh story positive story