लग्नातील बचतीतून अंगणवाड्यांना एलईडी!

संदीप गाडवे
बुधवार, 20 मार्च 2019

केळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.  

केळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.  

सध्याच्या काळात लग्न म्हटले की वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा ओघाने येतो. त्यात उद्योगपती, व्यावसायिक, मोठमोठे बागायतदार, डॉक्‍टर, अभियंता, भरीसभर म्हणून वर्ग एक, दोन पदावरील शासकीय अधिकारी लग्नात मोठ्या प्रमाणावर खर्च करणे हे प्रतिष्ठेचे समजतात. मात्र, याला छेद देत श्री. बुद्धे यांनी आपले लग्न अत्यंत साधेपणाने व अनावश्‍यक खर्चाला फाटा देवून करून बचत केलेले पैसे समाजासाठी देण्याचा निर्णय घेऊन इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात श्री. बुद्धे हे जावळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी रूजू झाले. हजर झालेल्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर मी लोकसेवक असून, मी माझ्या पगारात समाधानी आहे, असा फलक लावून जावळीवासीयांची मने जिंकली होती. आपला वाढदिवस साजरा करतानादेखील फारसा डामडौल न दाखवता आपल्या सहकारी ग्रामसेवकांना बरोबर घेऊन त्यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्यासाठी प्रयत्न केले आहेत. तालुक्‍यात दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर घेऊन आपल्यातील संवेदनशीलतेची जाणीवही दाखवून दिली आहे. नेहमीच सामाजिक कार्यात तत्पर असणाऱ्या श्री. बुद्धे यांनी आपल्या लग्नपत्रिकेवर कागदी-कापडी पिशव्या वापरा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा, स्वच्छ भारत सुंदर भारत, एक पाऊल स्वच्छतेकडे असे पयार्वरणपूरक संदेश मुद्दामहून टाकले आहेत. त्यामुळे वराडी मंडळींचेही चांगले प्रबोधन झाले.

एक आदर्श अधिकारी असलेल्या श्री. बुद्धे व त्यांची नवविवाहित पत्नी मयूरी यांनी लग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून लातूर जिल्ह्यातील दोन अंगणवाडी केंद्रांना एलईडी संच भेट म्हणून दिले आहेत. त्यांचे बंधू संतोष यांनी यासाठी पुढाकार घेतला. श्री. बुद्धे यांच्यासारखी सामाजिक बांधिलकी जर सर्वच नवविवाहित दांपत्यांनी दाखवल्यास खऱ्या अर्थाने आदर्श, समृद्ध खेडी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Anganwadi LED