लग्नातील खर्च वाचवून दुष्काळग्रस्तांना मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत सुपूर्त केली.

बुध - नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत सुपूर्त केली. 

लग्नाची बोलणी करतानाच ननावरे कुटुंबीयांनी नोंदणी पध्दतीने विवाह करून लग्नासाठी होणारा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जाधव कुटुंबीयांनीही त्यास तत्काळ होकार दिला. विशाल आणि सुश्‍मिताचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. लग्नातील वाचवलेली रक्कम दुष्काळग्रस्तांना पोचविण्यासाठी ननावरे आणि जाधव कुटुंबीयांनी थेट सातारा येथील जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे विशाल आणि सुश्‍मिता यांनी ४० हजारांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘‘समाजात आजही अशा उदात्त विचारांची माणसे आहेत, हे पाहून खूप आनंद झाला. लग्नातील अनावश्‍यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा विशाल, सुश्‍मिताचा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.’’ विशाल ननावरे म्हणाले, ‘‘नागनाथवाडीसह खटाव-माणमधील जनता पाणीटंचाईने हैराण झाली आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये मदत करण्याच्या हेतूने विवाह खर्चाला फाटा देत मदत केली.’’ 

या वेळी निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, शंकरराव ननावरे, भीमराव जाधव, छाया ननावरे, संभाजी घाडगे, सुनील निंबाळकर, शोभा ननावरे, वर्षाराणी फडतरे, सुरेश घाडगे, प्रकाश बागल, पुंडलिक ननावरे, विशाल जाधव, सुधाकर घाडगे, प्रतापराव घाडगे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage Expenditure Drought Affected Help Nanaware Family Motivation