शिवारात विवाह अन्‌ वऱ्हाडींचे श्रमदानही!

राजेंद्र शिंदे
बुधवार, 10 मे 2017

भोसरेतील दोन जवानांचा समाजोपयोगी उपक्रम; पाणी चळवळीला दिले बळ

खटाव - भोसरे (ता. खटाव) हे गाव सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शौर्याबद्दल प्रसिध्द आहे. आता या गावाची जलसंधारण व समाजोपयोगी उपक्रमांमुळे वेगळी ओळख होत आहे. पाण्याचे महत्त्व स्वतःलाही व जगालाही पटवत विवाहासारख्या कार्यक्रमात होणारा अनाठायी खर्च टाळून तेच पैसे इतर विधायक कामासाठी कसे वापरता येतील, याचा एक आदर्शच या गावाने घालून दिला आहे.

या गावातील सचिन जाधव व अनिता येवले तसेच सागर पवार व ज्योती थोरात या नवदांपत्याच्या विवाहाचे शिवारात आयोजन करून एक आगळा वेगळा व नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. जलसंधारणाचे काम ग्रामस्थ करत आहेत. या कामाला खूप मोठी आर्थिक ताकदीची गरज आहे, हे गावातील युवा पिढीच्या लक्षात आले. प्रत्येक जण आपापल्या परीने या कामात तन, मन, धन देत आहे. आपणदेखील त्यात मागे पडायचे नाही, या विचाराने सचिन व सागर यांनी आपला विवाह साध्या पद्धतीने करायचा ठरवले, तोही श्रमदान सुरू असलेल्या ठिकाणी. त्यातून पैसा व वेळेची बचत होईल, हा उद्देश होता. पारंपरिक पद्धतीने लग्न घेतले तर गावकऱ्यांचा श्रमदानाचा दिवस बुडणार होता आणि लग्नावर अनाठायी खर्चही होणार होता. त्याच पैशाने गावात पाण्याची सोय होणार असेल तर या विधायक कामात आपलेही योगदान असावे, असे या दोन्ही मित्रांनी ठरविले. सचिन हा ‘सीआरपीएफ’मध्ये नोकरी करतो. तर सागर ‘बीएसएफ’मध्ये. त्यांच्या अर्धांगिनींनीदेखील या अनोख्या पद्धतीच्या लग्नाला होकार दिला. 

या अनोख्या विवाहप्रसंगी आमदार जयकुमार गोरे व माजी आमदार प्रभाकर घार्गे उपस्थित राहिले. दोन्हीही नेते भारावून गेले. गोरेंनी गावातील जलसंधारणाचे काम संपेपर्यंत डिझेलसह पोकलेन मशिन देण्याची ग्वाही दिली. दोन्हीही नेत्यांनी नवदांपत्यांबरोबर शेतात श्रमदानही केले. श्रमदानानंतर त्याच ठिकाणी ग्रामस्थांची भोजनाची व्यवस्था होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage & labour donation