#TuesdayMotivation : प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारी

Megha Deshmukh story
Megha Deshmukh story

परभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील उच्चशिक्षित मेघा विलासराव देशमुख यांनी चिकाटी व जिद्द दाखवत संकटे व प्रतिकूल परिस्थितीतून आपली शेती प्रगतिशील व व्यावसायिक करण्यात यश मिळवले आहे. वडिलांचे मार्गदर्शन घेत आठ एकरांत पेरू बागेचे व्यवस्थापन उत्तम साधले आहे. शेतीकामांत कौशल्य मिळवण्यासह विक्रीव्यवस्था उभी केली आहे. सामाजिक कार्यातही आघाडी घेताना साहित्यिक दृष्टिकोनही जपला आहे. 

झरी (ता. जि. परभणी) येथील कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख झरीकर यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांच्या कन्या मेघा देशमुख यांनी वडिलांचा वारसा पुढे समर्थपणे सुरू ठेवत प्रयोगशील शेतीचा आदर्श उभारला आहे. मेघा यांचा परभणी नजिकच असलेल्या झरी येथील विलासराव सावंत देशमुख यांच्याशी विवाह झाला. त्यांची सुमारे ४० एकर जमीन आहे. सिंचनासाठी तीन विहिरी आणि बोअरची सुविधा आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके घेतली जात होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना मेघा यांच्या पतीचे अकाली निधन झाले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. पोकळी भरून येणे अशक्य होते. परंतु, हळूहळू हिंमत एकवटत मेघा यांनी संसाराची घडी बसवण्यास सुरवात केली. शेतीबरोबरच मुलगा विक्रांतला वाढवायची देखील जबाबदारी होती.  

शेतीची जबाबदारी सांभाळली
शेतीत संकटे आ वासून उभी होतीच. पावसाचे अनियमित प्रमाण, असमान वितरण, दीर्घ खंडकाळ आदी कारणांमुळे पारंपरिक पध्दतीतून उत्पादन आणि उत्पन्नाची शाश्वती राहिली नव्हती. मात्र जिद्द व चिकाटीने मेघाताईंनी शेतीची जबाबदारी सासरे व वडील अशा दोघांच्या मार्गदर्शनाखाली अंगावर घेतली. दरम्यानच्या काळात सासऱ्यांचेही निधन झाले. मेघाताईंसाठी हा पुन्हा धक्का होता.पण पुन्हा एकदा खचून न जाता त्यांनी स्वतःला सावरले. या काळात वडील सूर्यकांतराव यांनी मोठा धीर दिला आणि पुढे वाटचाल करण्याचे बळ दिले. 

***********************************************

वडिलांच्या मार्गदर्शनातून शेती 
वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मेघाताईंची प्रयोगशील शेतीची वाट सुरू झाली. पाण्याची उपलब्धता, बाजार पेठेतील मागणी आदी बाबींचा अभ्यास करून त्यांनी तुलनेने पाण्याची कमी गरज असलेल्या पेरू या फळपिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या साथीने नगर, नाशिक, सांगली आदी जिल्ह्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांची शेती अभ्यासली. पारंपरिक पध्दतीत पेरूची २० बाय २० फूट अंतरावर लागवड केली जाते. मात्र मेघाताईंनी छाटणी, उत्पादन, उत्पन्न या साऱ्या बाबी लक्षात घेऊन लागवड अंतरात बदल करण्याचे ठरवले. अलाहाबाद सफेदा या जातीची छत्तीसगड येथून प्रतिनग ३० रुपये दराने रोपे आणून चार एकर क्षेत्रावर १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली.

त्यातून एकरी झाडांची संख्या ४३५ पर्यंत वाढली. आजमितीला जुनी व नवी धरून एकूण आठ एकरांवर पेरू लागवड आहे. एलाहाबाद सफेदा जातीचे पेरू चविष्ट असतात. बियांची संख्या कमी आहे. बिया अधिक टणकही नाहीत. त्यामुळे ग्राहकांची अधिक पसंती असते.

उत्पादन व उत्पन्न 
पहिल्या वर्षी (२०१६) मध्ये एकूण क्षेत्रातून ४० टन पेरू उत्पादन तर साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०१७ मध्ये ५२ टन तर २०१८ मध्ये ६० टन उत्पादन मिळाले. परभणी तसेच अन्य ठिकाणी फळांची विक्री केली. त्यास २० ते २२ रुपये प्रतिकिलो दर मिळाले. मात्र, घरच्या जबाबदाऱ्या व शेती व्यवस्थापन अशा दोन्ही आघाड्यांवर काम करताना विक्री व्यवस्थादेखील पाहणे आव्हानाचे काम होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनाच बाग देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार ती सहा ते साडेलाख रुपयांना दिली. तोडणीची जबाबदारी व्यापाऱ्याकडे असल्याने त्या कामाचा ताण कमी होतो. 

आठ एकरांत लिंबू लागवड 
मार्केटमध्ये जे विकतयं ते पिकवायचं हा उद्देश ठेवून गेल्यावर्षी आठ एकरांवर लिंबाची लागवड केली आहे. त्यामध्ये चार एकरवर बालाजी लेमन उर्वरित क्षेत्रात फुले सरबती, एनआरसीसी ७ जातीची लागवड आहे.

***********************************************

***********************************************

विहिरी पुनर्भरण 
सिंचनासाठी तीन विहिरी असल्या तरी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता राहात नाही. त्यामुळे दोन विहिरींचे पुनर्भरण केले आहे. शेतातील वाहून जाणारे पावसाचे पाणी विहिरीमध्ये साठवून राहू लागल्याने पाण्याची उपलब्धता वाढली. संपूर्ण आठ एकर पेरू बागेला ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दिले जाते. 

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न 
मेघाताईंच्या पुढाकाराने झरी येथील अक्षिणा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गाव तसेच परिसरातील गरजू विधवा, परित्यक्ता महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले जाते. याव्दारे सुमारे ४०० महिला स्वावलंबी झाल्या आहेत. महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांची जनजागृती मेघाताई करतात. 
 
सर्व कामांत कुशल  
मेघाताई परभणी येथे राहतात. दररोज सकाळी साडेदहा वाजता आपल्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन सांभाळून झरी येथील शेताकडे जातात. सर्व कामे करून दूध घेऊन पुन्हा परभणीला परततात. फोर व्हीलर तसेच ट्रॅक्टर चालविणे, प्रसंगी खुरपणी अशी कामेही करतात. मुलगा विक्रांत याला अभियंता म्हणून त्यांनी घडवले आहे. एका संस्थेतील चार अनाथ मुलांनाही दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या करतात. झरी ग्रामपंचायतीच्याही त्या सदस्य आहेत. मराठी विषयात एम.ए केलेल्या मेघाताईंचा पतीच्या आठवणीच्या अनुषंगाने तुला आठवताना हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला आहे.

व्यवस्थापन 
  लागवडीनंतर सुमारे तीन वर्षांनी उत्पादन घेण्यास सुरवात.    झाडे लहान आकाराची असताना झेंडूचे उत्पादन घेत खर्च कमी केला.   दरवर्षी मृग बहाराचे उत्पादन.   पेरूचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत चालतो.    साधारण एप्रिलपासून पाण्याची उपलब्धता कमी. एप्रिलमध्ये छाटणी.    शेणखत, गांडूळ खत, जीवामृत आदी निविष्ठांची निर्मिती व वापर होतो. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला राहून बाजारात चांगला दर मिळतो.

पुरस्काराने सन्मानित...
मेघाताईंचा अनुभव व प्रेरणेतून झरी गाव व परिसरात सुमारे ५० एकरांवर पेरूची लागवड झाली आहे. शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदा पुसद (जि. यवतमाळ) येथील कै. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. जुलैमध्ये दूरदर्शन तर्फे सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारही देण्यात आला आहे.  

  मेघा देशमुख, ८२७५२३८८९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com