माणसाला माणसात आणण्यासाठी झटतेय माणुसकी !

परशुराम कोकणे
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

बेवारस मनोरुग्णांशी संवाद साधून, त्यांना मदत करून एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळत आहे. शहरातील इतरही मनोरुग्णांना मदत करण्यासाठी तरुण मित्रांनी पुढे यावे. मनोरुग्णांची माहिती देण्यासाठी 9765065098 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 
- आतिश सिरसट, सामाजिक कार्यकर्ते 

सोलापूर - आपण इतके स्मार्ट झालोय की शेजारी बसलेल्या कुटुंबातील सदस्याला, मित्राला बोलायलाही वेळ नाही. जवळच्यांना सोडून दूरवर असलेल्यांशी चॅट करण्यात आपण आनंद मानतोय. एकीकडे असे चित्र असताना सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ता आतिश सिरसट याने बेवारस मनोरुग्णांशी संवाद साधून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आतिशने सोमवारी सात बेवारस मनोरुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी रायगड येथे पाठविले आहे. 

दयानंद महाविद्यालयात बीएच्या शेवटच्या वर्षाला असणारा आतिश काही महिन्यांपूर्वी सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात गेला होता. तिथे बसलेल्या एका मनोरुग्ण महिलेची अवस्था पाहून तो अस्वस्थ झाला. तिला काहीतरी मदत करावी, या हेतूने तो पुढे आला. सुरवातीला त्या महिलेने काहीच प्रतिसाद दिला नाही. तो सातत्याने तिला भेटण्यासाठी जात राहिला. घरून डबा नेऊन त्याने अनेकवेळा तिला जेवूही घातले. तेथील सफाई कामगार महिलांच्या माध्यमातून तिला अंघोळीही घातली. त्यानंतर जणू मनोरुग्णांना मदत करण्याचे वेडच आतिशला लागले. 

आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेमुळे स्वत:चे अस्तित्व विसरून रस्त्यावर भटकणाऱ्या प्रत्येक मनोरुग्णाला आतिश भेटतो. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधून खायला आणून देतो. थंडीपासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून कपडेही नेऊन देतो. सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील मनोरुग्ण महिलेवर उपचार व्हावेत यासाठी आतिशने फेसबुक मित्र रणजित लोंढे यांच्या माध्यमातून मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या कर्जत (जि. रायगड) येथील श्रद्धा फाउंडेशन या संस्थेशी संपर्क केला. अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर सोमवारी त्या संस्थेचे पथक सोलापुरात आले. सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील मनोरुग्ण महिलेसह शहरातील दोन महिला आणि पाच पुरुष मनोरुग्णांना रुग्णवाहिकेतून कर्जतला उपचारासाठी नेण्यात आले आहे. आपले शिक्षण, नोकरी आणि कुटुंब सांभाळून मनोरुग्णांच्या शोधात भटकणाऱ्या आतिशला त्याचा जवळचा मित्र विक्रांत गायकवाड याच्यासह वडील लक्ष्मण सिरसट, आई कविता सिरसट, पत्नी राणी यांचे सहकार्य मिळत आहे.

Web Title: mentally challenged people going to hospital