#MondayMotivation : झोपडपट्टीतील महिलांना डिजिटलचे धडे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

ऑनलाइन खरेदी करणे असो की ओला, उबर बुक करणे, पेटीएमद्वारे पैसे देणे तसेच मेलद्वारे नोकरीसाठी अर्ज करणे अथवा ऑनलाइन नोकरीविषयक व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अर्ज असो अशा डिजिटल जगतातील अनेक बाबी आमच्यासाठी आता अवघड राहिलेल्या नाहीत, अशी भावना गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीतील झोपडपट्टीमधील महिलांनी व्यक्त केली.

सहकारनगर - ऑनलाइन खरेदी करणे असो की ओला, उबर बुक करणे, पेटीएमद्वारे पैसे देणे तसेच मेलद्वारे नोकरीसाठी अर्ज करणे अथवा ऑनलाइन नोकरीविषयक व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अर्ज असो अशा डिजिटल जगतातील अनेक बाबी आमच्यासाठी आता अवघड राहिलेल्या नाहीत, अशी भावना गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीतील झोपडपट्टीमधील महिलांनी व्यक्त केली.

ठाकरे झोपडपट्टीत उभारण्यात आलेल्या समाज मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून समाज विकास प्रकल्पांतर्गत व एनआयआयटी संर्स्थेतर्फे डिजिटल साक्षरता अभियान सुरू आहे. १४ ते ७० वर्षांपर्यंतचे नागरिक डिजिटल साक्षरतेचे धडे गिरवत आहेत. 

चिंचणे म्हणाल्या, ‘आतापर्यंत ७५० जणांनी संगणक साक्षरतेचे धडे गिरवले आहेत. घरेलू कामगार महिला, गृहिणी, विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. यातून वस्तीमधील नागरिकांचे जीवनमान उंचावत आहे. ज्या महिलांना मोबाईलसुद्धा हाताळता येत नाही, अशा महिला स्वतः संगणकाचा वापर करत आहेत.’ 

चाँदबीबी लुकडे म्हणाल्या, ‘घरचे काम करत असून, लहान मुलाला घेऊन संगणकाचे धडे गिरवले आहेत. डिजिटल साक्षरता वर्गामधील मी पहिली महिला आहे. माझ्यामुळे अनेक महिला येथे शिकत आहेत. मला फेसबुक, मेल, व्हॉट्‌सॲप, स्मार्ट फोन आता योग्य रीतीने वापरता येत आहे. वीजबिल, ओला कॅब बुक करत आहे.’

गणेश शेरला म्हणाले, ‘झोपडपट्टीमध्ये दोन वर्षांपूर्वी संगणक साक्षरता उपक्रम राबविण्यात आला. अनेक महिलांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आणि आपला राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. वस्तीमधील तरुणही आता स्मार्ट होत आहेत. 

या वेळी एनआयआयटीच्या कोमल चिंचणे, गणेश शेरला, वैशाली कोटेकर, चाँदबीबी लुकडे, वैशाली शिंगे, आशिया शेख, जरिना निसार, यश सोनवणे, अंजली चक्रवधी, सरूबाई सुतार, अलका जाधव, कोमल साळुंखे, बिद्रावंती यादव, अनुसया गायकवाड, अश्‍विनी राऊत उपस्थित होत्या. हा उपक्रम सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी राबविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monday Motivation Digital lessons for slum women