सासूने किडनी देऊन सुनेला दिले जीवदान

अशोक तोरस्कर
रविवार, 10 मार्च 2019

सासू-सून या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे नाणं खणखणीत असंल तरच मुलाचा संसार सुखाचा होईल. मुलाच्या सुखातच आपलं सुख मानत आले.  त्यांच्यासाठी त्याग करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
-अनुसया हत्तरगे, सासूू .

उत्तूर - सासू-सुनेचे नाते तसे न पटणारे, असे समीकरणच ठरून गेले आहे. सासू कधीही आई होऊ शकत नाही, तसेच सुनेला ती नेहमीच पाण्यात पाहते, अशी भीती सुनेला असते. पण सगळ्याच सासू एकसारख्या नसतात. त्या आपल्या सुनेवरही मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतात, हे उत्तूर (ता. आजरा) येथील हत्तरगे कुटुंबातील एका सासूने सिद्ध करून दाखविले आहे. 

आपल्या ३९ वर्षीय सुनेला किडनी दान करून तिला जीवदान दिले आणि सासू-सुनेच्या नात्याला एक वेगळे वलय दिले. सासू-सुनेच्या गोड नात्याचा इतर सासूंसमोर त्यांनी वेगळा आदर्शाचा परिपाठ घालून दिला. अनुसया हणमंत हत्तरगे (वय ६५) असे या सासूचे नाव आहे. रेखा मारुती हत्तरगे (वय ३९) या सुनेसाठी त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. 

रेखा हत्तरगे या दोन वर्षांपासून किडनीच्या रोगाने त्रस्त होत्या. वर्षभर त्या डायलेसीसवर होत्या. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्‍टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. रेखा यांचा ब्लड ग्रुप ‘एबी’ पॉझिटिव्ह यामुळे त्यांना इतर नातेवाइकांची किडनी जुळत नव्हती. कुटुंबात चर्चा झाली. क्षणाचाही विचार न करता अनुसया किडनी देण्यास तयार झाल्या.

नेरुळ येथील अपोलो रुग्णालयात सर्व चाचण्यांनंतर त्यांची किडनी सुनेसाठी जुळली आणि सासूच सुनेसाठी देवाच्या रूपाने धावून आल्या. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता  शस्रक्रियेला सुरवात झाली. रात्री १२ वाजता पूर्ण झाली. अपोलो रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. डॉ. अमोल पाटील व डॉ. रवींद्र निखालजी व अन्य स्टाफने  ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

सासू-सून या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे नाणं खणखणीत असंल तरच मुलाचा संसार सुखाचा होईल. मुलाच्या सुखातच आपलं सुख मानत आले.  त्यांच्यासाठी त्याग करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
-अनुसया हत्तरगे,
सासूू .

किडनी दान करून सासूंनी मला नवे आयुष्य दिले आहे. कदाचित गतजन्माचे आमचे मुलगी व आईचे नाते असावे. सासू ही आईच आहे, असे मी समजते.
-रेखा हत्तरगे,
सून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother-in-law give her kidneys special story