अनाथ जनावरांचे मुक्तांगण मिरज तालुक्यातील बेळंकीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

देशभरातील एक प्रमुख अनाथाश्रम बेळंकी (ता. मिरज) येथे उभा राहिलाय तो माणसांसाठी नव्हे, तर बेवारस जनावरांसाठी हक्काचा निवारा ठरलाय. आजमितीला ५४ जनावरे मुक्तपणे राहताहेत.

केरळमधील पुरात ‘महादेव’ गटांगळ्या खात होता.. दोन वर्षांचा ‘कारो’ जखमी अवस्थेत सोलापुरात फिरत होता.. ‘सीना’ची अवस्थाही अशीच होती. कोणी तरी येईल आणि असह्य वेदनांतून मुक्ती देईल या प्रतीक्षेत अंगभर वेदना घेऊन पंढरपुरात फिरत होती. ‘सोन्या’ आणि ‘गुणा’चे खांदे निखळले होते. प्रत्येकाच्या कहाण्या निरनिराळ्या असल्या तरी सर्वांच्या तळाशी असह्य वेदनेचा समान दुवा होता. त्या जाणल्या ॲनिमल राहतने. कार्यकर्त्यांनी भूतदयेचा हात पुढे केला. उपचार केले, वेदनांतून मुक्ती दिली. अनाथाश्रमात निवारा दिला. 

आज देशभरातील एक प्रमुख अनाथाश्रम बेळंकी (ता. मिरज) येथे उभा राहिलाय तो माणसांसाठी नव्हे, तर बेवारस जनावरांसाठी हक्काचा निवारा ठरलाय. आजमितीला ५४ जनावरे मुक्तपणे राहताहेत.

एरवी ॲनिमल राहतचे कार्यकर्ते दिसतात ते जखमी जनावरांवर उपचार करताना, वेदनेतून त्यांची मुक्तता करताना. औषधोपचारानंतर सुदृढ झालेल्या जनावरांचे पुढे काय करायचे हा मोठा प्रश्‍न होता. तो सोडवण्यासाठी बेळंकी येथे दहा एकरात अनाथाश्रम साकारला. सध्या तेथे २४ बैल, १९ घोडे, पाच कुत्रे, चार गाई, तीन म्हशी आणि तीन उंटांना आश्रय मिळाला आहे. मुक्तपणे फिरण्यासाठी सुरक्षित माळरान, सावली, चारापाण्याची सोय, औषधोपचाराची सोय आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येकाची कहाणी अनोखी आहे.

मुंबईत व्हिक्‍टोरीया बग्गीला जुंपलेल्या घोड्यांच्या मुक्ततेसाठी न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानेच व्हिक्‍टोरीयाची उमदी घोडी अनाथाश्रमात राहताहेत. सांगलीत रस्तोरस्ती फिरणाऱ्या ‘मीना’ गाईची शिंगे अस्ताव्यस्त वाढून तिच्याच डोक्‍यात घुसली होती. ती कापून तिला वेदनेतून मुक्त केले. केरळच्या महापुरातून वाचलेला महादेव खोंड, कासरा बांधल्याने जखमी झालेला सोलापुरचा कारो खोंड, पंढरपुरात चंद्रभागेकडेला वेदना घेऊन भटकणारी सीना गाय या सर्वांचा मुक्काम सध्या या अनाथाश्रमात आहे. साखर कारखान्यावर ऊसाचे ओझे वाहून मृृत्युपंथाला लागलेली सोन्या-गुण्याची जोडीही आता येथेच विश्रांती घेत आहे.

देशातल्या प्रमुख अनाथाश्रमांपैकी हा एक आहे. दहा एकर क्षेत्राला कुंपण घालून जनावरांसाठी मुक्तांगण तयार केले आहे. त्यांना बांधून ठेवले जात नाही. दिवसभर खाऊन-पिऊन मुक्त वावर सुरु असतो. जीवनाचे खरेखुरे स्वातंत्र्य ती अनुभवताहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktangan of orphan animals Belanki in Miraj taluka