मेडिकलमधील ‘हृदया’चे चेन्नईत प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

मेडिकलमधील हे पहिलेच अवयवदान असेल. या अवयवदानातून चार जणांचा जीव वाचविण्यात मेडिकलला यश आले. मृतांच्या नातेवाइकांच्या सहमतीने तसेच विभागीय अवयवदान समितीचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह मेडिकलमधील डॉक्‍टर, परिचारिका त्यांच्या प्रयत्नातून हे पुण्यकर्म करण्याचा क्षण प्राप्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी शासनाच्या पुढाकाराने मेडिकलमध्ये राबविण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती अभियानाचे हे यश आहे. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला रवाना झाले. फोर्टिस रुग्णालयात गरजूच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. तर, पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात मेडिकलमधून ‘यकृत’ पाठविण्यात आले. नेत्रगोल मेडिकलच्या नेत्रपेढीला दान करण्यात आले. 

मूळचे कोंढाळी येथील रहिवासी सुभाषराव यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात जखमी झाले. मेंदूला गंभीर दुखापत झाली. अखेरच्या समयी औषधाला उपचार देणे बंद केले. डॉ.  स्वप्ना कानझोडे यांनी मेंदूमृत घोषित केले. दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्‍टरांनी नातेवाइकांचे समुपदेशन केले. अवयवदानास नातेवाइकांनी होकार देताच विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क साधला गेला. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ मध्यवर्ती अवयवदान समितीशी संबंधितांशी चर्चा केली. चेन्नई येथील फोर्टिस रुग्णालयात हृदयाच्या प्रतीक्षेत गरजू रुग्ण होता. येथील पथक मध्यरात्री मेडिकलमध्ये दाखल झाले. पहाटे सहा ते साडेनऊ या वेळात शस्त्रक्रियेतून ‘हृदय’  आणि ‘यकृता’चे दान घेऊन हे पथक विमानाने चेन्नई आणि पुण्याला रवाना झाले. दुपारी यशस्वी प्रत्यारोपण झाल्याची माहिती चेन्नईचे डॉ. मुरली यांनी कळविले. किडनीचे दान मात्र करता आले नाही.

मेडिकलच्या नेत्रविभागाला नेत्रगोल दान करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर सकाळी ९ वाजून ४५ ते १०.४५ या कालावधीत यकृत आणि हृदय विमानाने रवाना केले. हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. आर. मोहन, यकृत प्रत्यारोपण करणारे तज्ज्ञ डॉ. दिनेश झिपरे यांच्यासह मेडिकलचे  अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात भूलरोगतज्ज्ञ डॉ. नरेश तिरपुडे, डॉ. वृंदा सहस्रभोजनी, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. राज गजभिये, डॉ. राजेश गोस्वामी, डॉ.व्ही.एल.गुप्ता, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. चंद्रशेखर पाखमोडे, डॉ. विजय श्रोते, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. पवित्रा पटनाईक, न्यूरोसर्जन डॉ. पटनाईक, डॉ. धुमणे, डॉ. केवलिया, डॉ. मुखर्जी, आयएमएच्या  नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. 

पोलिसांनी उभारला ‘ग्रीन कॉरिडॉर’
सकाळी साडेनऊ सुमारास वाहतूक विभागाने अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वेळ वाहतूक थांबविण्यात येईल, अशी सूचना देणारे वाहन रस्त्यावर फिरविले आणि काय आश्‍चर्य..! हृदय आणि यकृत घेऊन जाणारी ॲम्बुलन्सच्या समोर पोलिस व्हॅन सायरन वाजवत निघताच मेडिकलपासून वर्धा रोड रिकामा झाला. ‘ग्रीन कॉरिडॉर’मधून अवघ्या काही मिनिटांत हृदय आणि यकृत विमानतळापर्यंत पोहोचले. ॲम्बुलन्स रस्त्याने निघाली त्यावेळी नागपूरचा श्‍वास  थांबल्याचा अनुभव आला. पोलिस उपायुक्त रवींद्र परदेसी, पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर, पोलिस निरीक्षक श्‍याम सोनटक्के, पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news heart transplant in medical hospital