अंधांनी दिली फुटपाथवरील मुलांना शिक्षणाची प्रेरणा

अंधांनी दिली फुटपाथवरील मुलांना शिक्षणाची प्रेरणा

नागपूर - आम्ही अंध आहोत...बालपणापासून प्रत्येक कामासाठी आमचे जीवन दुसऱ्यावर अवलंबून... तरीही आम्ही शिक्षणाची कास धरून स्वतःचा विकास करतोय... उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहतोय... तुम्हाला तर दृष्टी आहे... हवं तसं जगू शकता... म्हणूनच या देव देणगीचा सदुपयोग करा... उच्च शिक्षित व्हा... असा प्रेरणादायी संदेश अंध विद्यार्थ्यांनी फुटपाथवरील मुलांना दिला. 

आत्मदीपम्‌ सोसायटी आणि उपाय या संस्थेच्या वतीने महाराज बाग रोडवरील फुटपाथवर ‘लुई ब्रेल’ यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शाळा भरविण्यात आली. बोटांच्या सहाय्याने अंधांना वाचनाचे ज्ञान देणाऱ्या लुई ब्रेल यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी फुटपाथवरील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अंध लोकही लिहू शकतात, वाचू शकतात याची माहितीच नसलेल्या फुटपाथवरील मुलांना आत्मदीपम्‌च्या विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपीतील गाणी, गोष्टी सांगितल्या. शिक्षणामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करण्याची क्षमता आपल्याला मिळते, असे सांगून, आत्मदीपम्‌ सोसायटीच्या सोनाली चवलढाल, प्रशांत पवनीकर, प्रशांत वरूडकर यांनी फुटपाथवरील मुलांचा दोन तास वर्ग घेतला. 

‘उपाय’ संस्थेतर्फे नागपूर शहरात आठ ठिकाणी फुटपाथवर सायंशाळा सुरू आहेत. यात संस्थेचे स्वयंसेवक फुटपाथवर राहणाऱ्या लोकांच्या मुलांना अक्षरओळख व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात ६ ते १४ वयोगटातील मुलांचा महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश निश्‍चित करून, त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम ‘उपाय’ संस्था करते. याच संस्थेतर्फे सुरू असलेल्या फुटपाथच्या शाळेत आत्मदीपम्‌ सोसायटीने कार्यक्रम घेतला. 

गरीब, फुटपाथवरील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी फुटपाथ शाळा सुरू करण्याचा विचार वरुण श्रीवास्तव यांच्या मनात आला. आयआयटी खडगपूर येथून पदवी घेतल्यानंतर मौदा एनटीपीसीमध्ये नोकरीवर असताना त्यांनी आपल्या विचाराला मूर्तरूप दिले आणि फुटपाथ शाळेचा जन्म झाला. आज भारतात २६ मुख्य सेंटर असून, अनेक ठिकाणी फुटपाथ शाळा भरते. एवढेच नव्हे तर गरीब मुलांना शिकविण्याचे कार्यही संस्थेच्या माध्यमातून केले जाते. एखाद्याला शिक्षित करण्याहून मोठा आनंद दुसरा नाही. 
- अर्चना श्रीवास्तव, विश्‍वस्त उपाय संस्था

अंधांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमान करणाऱ्या लुई ब्रेल यांचे कार्य कदापि विसरता येणार नाही. अंधांना लिपी बहाल करून त्यांनी जगण्याचा अर्थ दिला. समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच आमची तळमळ आहे. अंध असूनही जग ज्ञानाने प्रकाशित करण्याचा संकल्पच आम्ही केला आहे.        
- जिज्ञासा चवलढाल, संस्थापिका आत्मदीपम्‌ सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com