त्वचादानातून वाचला ‘त्या’ माउलीचा संसार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

उपराजधानीत १७ जणांच्या दानातून २६ जणांचे वाचले प्राण

नागपूर - दोन वर्षांपूर्वीची घटना. पाण्याचा बंब पेटविताना चेहरा आणि हात भाजले. त्वचा उघडी पडली होती. मनात वेदना होती. हातही वाकडा झाला. परंतु, नागपुरातील संस्था धावून आली. दानातून मिळालेल्या त्वचेने जखमा बऱ्या झाल्या. मोडकळीस आलेला संसार वाचला. पती, दोन मुले असलेला संसार आनंदाने सुरू आहे. जळाल्यानंतर अनुभवांना व भावनांना श्‍वेताने (बदललेले नाव) वाट मोकळी करून दिली. उपराजधानीत १७ लोकांच्या त्वचादानातून २६ जणांचे प्राण वाचविण्यात नागपुरातील त्वचापेढीला यश आले आहे.

जळीत रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणातून (होमोग्राफ्टिंग) वाचविणे शक्‍य आहे. देशात दरवर्षी भाजल्यामुळे ३० लाख लोक जखमी होतात. यातील १० लाख लोक मृत्युमुखी पडतात. अनेकांना कायमचे अपंगत्व व विद्रुपता येते.

स्वयंपाक करताना गॅस, स्टोव्हचा भडका 
उडाल्यामुळे भाजणे, विजेचा अपघात, आग लागल्यामुळे, फटाक्‍यांमुळे, उकळत्या पाण्यामुळे त्वचा भाजते. हुंड्यासाठी पेटवून देणे हा प्रकारही समाजात आहे. अशा जळीत रुग्णांचा जीव त्वचादानातून वाचविता येतो.
भाजल्यानंतर त्वचा उघडी पडते. जखमा उघड्या पडतात. संसर्ग होतो. जखम चिघळते आणि रुग्ण मृत्युमुखी पडतो. शरीरातील उष्णता, पाणी कमी होते. त्वचादानामुळे या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते. त्वचादानामुळे ६० टक्के लोकांचे जीव वाचवून त्यांच्या जळीत आयुष्यावर फुंकर घालता येते, असे प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार म्हणाले. नागपुरात रोटरी क्‍लब, ऑरेंज सिटी हॉस्पिटल व नॅशनल बर्न सेंटर (मुंबई) यांच्या सहकार्याने २२ फेब्रुवारी २०१४ मध्ये पहिली त्वचापेढी (स्किन बॅंक) सुरू झाली. विशेषत: जळितांच्या दुखण्यावर फुंकर घालण्यासाठी नागपुरातील त्वचापेढी वरदान ठरू शकते.

असे करता येते त्वचादान
१८ वर्षांपुढील व्यक्तीची त्वचा दान करता येते. 
मृत्यूनंतर सहा तासांमध्येच त्वचादान होणे आवश्‍यक आहे.
नैसर्गिक, अपघाती, मेंदू मृत व्यक्ती त्वचादान करू शकतात.
एड्‌सग्रस्त, एचआयव्ही पॉझिटिव्ह, कावीळ पॉझिटिव्ह व्यक्तींचे त्वचादान स्वीकारले जात नाही.

मृत्यूनंतरच्या त्वचादानाबाबत समाजात गैरसमज असल्याने अल्प प्रतिसाद आहे. त्वचादात्याची संपूर्ण त्वचा काढली जात नाही. केवळ एक अष्टमांश त्वचा काढली जाते. यामुळे मृत व्यक्ती विद्रूप दिसत नाही. विकृतीशिवाय ३० मिनिटांत त्वचादान होते.
- डॉ. समीर जहागीरदार, प्लास्टिक सर्जन, नागपूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news life saving by skin donate