नीतासाठी अष्मंत ठरला देवदूत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नाशिक - पुलावरून नदीत उडी मारून जीव देणाऱ्या तरुणीला रस्त्यावरून जात असलेल्या तरुणाने जिवाची पर्वा न करता तिच्या पाठोपाठ उडी मारत वाचविले. प्रजासत्ताकदिनी दुपारी दीडच्या सुमारास गंगापूर रोडवरील कटारिया ब्रिज येथे ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तरुणीला ताब्यात घेतले. जिवाची बाजी लावणाऱ्या तरुणाच्या शौर्याचे कौतुक केले.

दोन महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने नाशिक रोड परिसरातील शिखरेवाडीत राहणाऱ्या आणि नामांकित खासगी बॅंकेत काम करणाऱ्या नीता ही दुःखाच्या गर्तेत गेली. यामुळे तिने जीवन संपण्याचा विचार केला. याच विचारात तिने प्रजासत्ताकदिनी दुपारी दीडच्या सुमारास कटारिया पुलावरून नदीत थेट उडी मारली. मात्र, याच वेळी या परिसरातून जाणाऱ्या अष्मंत दातरंगे (रा. नवी पंडित कॉलनी) याने ते पाहिले. त्याने क्षणाचाही विलंब न करता पुलावरून उडी मारत तरुणीला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. २५ फुटांवरून उडी मारल्याने अष्मंत खोल गाळात आणि पाणवेलींमध्ये अडकला होता. पण जिद्दीने त्याने पाणवेली आणि गाळातून आपली सुटका करून घेत तरुणीचा शोध घेताच प्रयत्न केला. काही सेकंदात तरुणीचा हात त्याला दिसला आणि तो पकडून त्याने पूर्ण ताकदीने तिला वर खेचले. आपल्याला कोणीतरी वाचवत आहे, असे कळताच तिने विरोध केला; परंतु अष्मंतने पूर्ण ताकद लावून नीताला काठावर आणले. तिच्या पोटातील पाणी काढून तिला शुद्धीवर आणले. जमा झालेल्या लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. आपण वाचल्याचे समजल्यानंतर नीताने ‘मला सोडा; मला जीव द्यायचा आहे,’ अशी जोरात किंचाळू लागली. पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात आणून शांत केले.

कोणाविरुद्ध आपली तक्रार नसल्याचे सांगत वडिलांच्या निधनामुळे व्यथित झाल्याचे तिने जबाबात सांगत तिच्या घरच्यांना बोलावून घेतले. तिला भावाच्या ताब्यात देण्यात आले. नीतासाठी देवदूत ठरणाऱ्या अष्मंत याने खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करत जीव देणाऱ्या तरुणीचे प्राण वाचवत मोठे कार्य केले.

Web Title: nashik news ashmant datrange life saving to neeta