झुल्यावरील कसरतींतून प्रेमबंधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

दीपक अन्‌ लव्हलीने मानले सर्कस हेच कुटुंब

दीपक अन्‌ लव्हलीने मानले सर्कस हेच कुटुंब
नाशिक  - बिहारमधील दीपक जयस्वाल (वय 27) अन्‌ आसाममधील लव्हली (31) यांची केरळमध्ये जम्बो सर्कसमध्ये झुल्यावरील कसरतीतून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन्‌ सहा महिन्यांत दोघांनी रेशीमगाठ बांधली. या तरुण दांपत्याने सर्कस हेच कुटुंब अन्‌ कलावंत हीच जात मानली. अमर सर्कसमधील झुल्यावरील कसरतींद्वारे दोघे नाशिककरांचे मनोरंजन करताहेत.

जमिनीपासून चाळीस फूट उंचावर दीपक- लवली कसरती करत असताना टाळ्यांचा कडकडाट करण्याचा मोह प्रेक्षकांना आवरत नाही. थरारक कसरती सादर करताना हात निसटला, तरीही चाळीस फुटांवरून खाली कोसळून अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते; पण दोघांच्याही हात आणि पायाचे संतुलन जबरदस्त असल्याने उंचावर कसरती सुरू असताना जमिनीवर जाळी उभारली जात नाही. याच कौशल्यामुळे ही जोडी देशभर परिचित आहे.

मुलीला डॉक्‍टर करणार
दीपक अन्‌ लव्हली या दांपत्याला दोन वर्षांची मुलगी आहे. स्नेहा असे तिचे नाव असून, सर्कसमध्ये आई-वडिलांच्या कसरतींचे प्रयोग पाहत लहानाची मोठी होतेय. दोघे कसरत सादर करत असतात, तेव्हा स्नेहाची काळजी सहकारी कलावंत घेतात. आमच्या गावात डॉक्‍टर नसल्याने मुलीला डॉक्‍टर करण्याची खूणगाठ दोघांनी बांधली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news deepak and lovely amar circus