भाजीपाल्यासाठी विक्रेत्यांनी घेतला मळ्यांचा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

जुने नाशिक  - भाजीविक्रीसारख्या हातावर व्यवसाय करून कुटुंबाचा उदनिर्वाह करणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या कुटुंबांवर शेतकरी संपाचा परिणाम होऊ लागला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, बाजार समितीत भाजीपाला येत नसल्याने विक्रेत्यांना मळ्यांत जाण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

जुने नाशिक  - भाजीविक्रीसारख्या हातावर व्यवसाय करून कुटुंबाचा उदनिर्वाह करणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या कुटुंबांवर शेतकरी संपाचा परिणाम होऊ लागला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, बाजार समितीत भाजीपाला येत नसल्याने विक्रेत्यांना मळ्यांत जाण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी संपाचा आज सहावा दिवस आहे. परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. बाजारपेठेत भाजीपाल्यासह अन्य प्रकारचा शेतमाल येऊ दिला जात नाही. भाजीपाला विक्री व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दुसरीकडे, नागरिकांची मागणी वाढत आहे. विक्रेत्यांकडे शेतमाल नाही. अशा वेळेस विक्रेते शहर परिसरातील शेतकऱ्यांच्या मळ्यांचा शोध घेत आहेत. ज्याठिकाणी मळा दिसेल तेथे विनंती करत काही प्रमाणात का असेना दुपटीच्या भावात भाजीपाला खरेदी केला जात आहे.

भाजीपाला मिळाल्यानंतर तो आणायचा कसा, असा नवा प्रश्‍न विक्रेत्यांना भेडसावत आहे. अशा वेळी रिक्षा व दुचाकीचा वापर करून थोड्या थोड्या प्रमाणात छुप्या मार्गाने भाजीपाल्याची वाहतूक विक्रेत्यांकडून केली जात असल्याने बाजारात चढ्या दराने भाजीपाला विक्री होत आहे. वाढलेल्या दरामुळे नागरिक आवश्‍यक तितकाच माल खरेदी करत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना काही प्रमाणात नुकसानही सहन करावे लागतेय. नाहीपेक्षा काहीतरी असे मानून त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

विक्रेत्यांमध्ये भीती
मळ्यांचा शोध घेऊन थेट तेथून भाजीपाला खरेदी केला, पण तो दुकानापर्यंत आणायचा कसा, कुणी मालाची वाहतूक करताना बघितल्यास काय होईल, असे अनेक प्रश्‍न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. विक्रेत्यांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होत आहे. यामुळे त्यांच्याकडून मोठ्या वाहनांचा उपयोग न करता रिक्षा, दुचाकीतून मालाची वाहतूक केली जाते.

भाजीपाल्याची आवक मंदावल्याने शहरी भागातील लहानसहान शेतकऱ्यांच्या मळ्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना विनंती करून त्यांच्याकडील भाजीपाला खरेदी करत विक्री केला जातोय.
- संतोष बिरम (विक्रेता)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news vegetables