दिवा लावूया, अंधार दूर करूया!

दिवा लावूया, अंधार दूर करूया!

कोल्हापूर - या दहा-बारा पोरांनी जेव्हा थम्सअप कोका कोलाच्या रिकाम्या मोठ्या बाटल्या गोळा करायला सुरवात केली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बाटल्या गोळा करून हे काय करणार?, अशा नजरेनेच त्यांच्याकडे बहुतेक जण पाहू लागले. 

या पोरांनी साठ-सत्तर बाटल्या गोळा केल्या आणि चक्क त्यांनी या बाटल्यात पाणी भरून परावर्तित प्रकाशतंत्राचे दिवे बनवले. त्याही पुढे जाऊन त्यांनी गगनबावड्यातील बुवाचीवाडी या धनरगरवाड्यातील घरांच्या छपरात हे दिवे बसवले. आणि या धनगरवाडीतील अंधाऱ्या खोल्यांना या बिनखर्चाच्या पाण्यावरच्या दिव्यांनी उजळून सोडले. 

बाटलीच्या दिव्याचे तंत्र असे
या तंत्राला राजारामपुरीतल्या या युवकांनी रिफ्लेक्‍टरची जोड दिली आहे. हे तरुण एका कौलात पाण्याने भरलेली बाटली बसवतात. बाटलीला रिफ्लेक्‍टर लावतात. जेथून कौलात बाटली घातली आहे. तेथे सील करतात व कौलासह ही बाटली घरावर बसवतात. त्यासाठी थोडा फार खर्च येतो, पण धनगरवाड्या-वस्तीवरील घरासाठी तो खर्च पोरं सहन करतात. अर्थात, फक्त दिवसाच या दिव्याचा वापर होतो, पण वाड्या-वस्तीवरील घरातील अंधाऱ्या खोलीवर हा प्रकाश २० वॉटच्या बल्बइतका असतो. 

तरुणाईने एखादे काम मनावर घेतले, तर काय बदल घडू शकतो, याचे हे लखलखते उदाहरण आहे. राजारामपुरीतील युवकमित्र मंडळाने हा ‘अंधेरेसे उजाले की ओर’ या उपकरणाद्वारे हे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांना आपणा सर्वांकडून फक्त शीतपेयाच्या रिकामी सव्वा लिटर बाटल्यांची गरज आहे. तुम्ही दिलेली एक रिकामी बाटली एक घर प्रकाशाने उजळून टाकेल, असा त्यांचा दावा आहे. 

या उपक्रमाचे नेतृत्व किशोर मळेकर या तरुणाकडे आहे. खूप सोप्या तंत्राने त्याने हा बाटलीचा दिवा बनवला आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘‘बाटलीच्या दिव्याचा हा शोध नवा नाही किंवा त्यांनी लावलेला नाही. ब्राझीलमध्ये मोझर लॅंप या नावाने हे तंत्र वापरले जाते. या तंत्रानुसार रिकाम्या बाटलीत स्वच्छ पाणी भरले जाते. ही बाटली छतावर अर्धी व छताखालच्या खोलीत अर्धी येईल, अशी बनवली जाते. 

या बाटलीत उन पडले, की परावर्तनाच्या तंत्रानुसार उन्हाचा प्रकाश पाण्यातून परावर्तित होतो व तो लख्खपणे उजळतो. दिवसभरात हा प्रकाश त्या खोलीला उजळवून टाकतो.  किशोर मळेकर यांच्यासह बाबा इंदुलकर, विशाल सुलाखे, गौरव करवडे, अमेय मळेकर, नितीन वंदुरे-पाटील, रवी शिंदे, चंद्रशेखर निकम, महेश मोरे, विक्रम पुरोहित हे तरुण या मोहिमेत सक्रिय आहेत.

या मोहिमेत सर्वांचा हातभार लागावा, यासाठी तुम्ही रिकामी बाटली द्या. ती युवक मित्रमंडळ, राजारामपुरी ११ वी गल्ली, रेणुका मंदिराजवळ येथे जमा करा. आपण सर्वजण मिळून जमेल तेवढी घरे प्रकाशमय करू या.
- किशोर मळेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com