देशसेवेसाठी निधीची "हवाई भरारी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मला हवाई दलात जायचे होते म्हणून मी आयटी कंपनीतील नोकरी सोडली. हवाई दलात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अभ्यास केला. विकेंडलाच मी अभ्यास करायचे. ही परीक्षा तीन वेळा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात माझी निवड झाली. आता मी माझ्या प्रशिक्षणासाठी लक्ष केंद्रित करत आहे. 
- निधी दुबे 

पुणे -आयटीमधील चांगल्या पगाराची नोकरी असताना, तिने देशसेवा करण्यासाठीची संधी शोधली आणि ती मिळवलीसुद्धा. हिंजवडीमधील अभियंता म्हणून काम करणाऱ्या निधी दुबेने ही किमया साधली आहे. तिची भारतीय हवाई दलातर्फे घेतलेल्या "लॉजिस्टिक्‍स ब्रॅंच- शॉर्ट सर्व्हिस कमिशन' परीक्षेत निवड झाली आहे. देशभरातून केवळ चार जणांना ही संधी मिळाली आहे. त्यात पुण्यातील निधीचा समावेश आहे. 

निधी मूळची नागपूरची असून गेल्या काही वर्षांपासून ती पुण्यात राहते. नागपूर येथील सेंटर पॉइंट स्कूलमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत तिने 93 टक्के गुण मिळविले. बारावीपर्यंतचे शिक्षण भारतीय विद्या मंदिरमध्ये घेतले. त्यानंतर रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून बीई इलेक्‍ट्रॉनिक्‍सची पदवी मिळविली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त ती 2014 मध्ये पुण्यात आली. हिंजवडीतील एका नामाकिंत कंपनीत तिला "सॉफ्टवेअर इंजिनिअर' म्हणून नोकरी लागली. मात्र, मुळातच देशसेवेसाठी काही, तरी करायची तिची लहानपणापासूनची इच्छा होती. त्यामुळे करिअरची वेगळी वाट निवडली असली, तरी तिचे ध्येय हे हवाई दलात जाणे हेच होते. म्हणून तिने नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास सुरू केला. खरंतर निधीचे वडील प्रद्युम्न दुबे हे नागपूर येथील "नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लॅंड यूज प्लॅनिंग'मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. तर तिची मोठी बहीण नूपुर दुबे ही भारतीय सेनादलात कॅप्टन म्हणून दिल्लीत कार्यरत आहे. वडील आणि बहिणीकडून प्रेरणा घेऊन निधीने पुण्यात नोकरी आणि अभ्यास सुरू केला. तिने भारतीय हवाई दलाची सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डची 2014 मध्ये पहिली परीक्षा दिली. लेखी परीक्षेत ती पास झाली; पण मुलाखतीत निवड झाली नाही. त्यानंतर 2015 मध्ये लेखी परीक्षा पास झाली आणि मुलाखतीसाठीही निवड झाली. पण, गुणवत्ता यादीत नंबर आला नाही. 2016 मध्ये लेखी परीक्षा पास झाली आणि मुलाखतीसाठी निवड झाली अन्‌ गुणवत्ता यादीत नंबरही लागला. या परीक्षेसाठी तिला ऍपेक्‍स करिअर या संस्थेचे मार्गदर्शन मिळाले. 

Web Title: Nidhi dube Indian Air Force