Nikita-Raut
Nikita-Raut

धावपटूच्या मदतीसाठी धावले पुणेकर

नागपूर - रेशीमबाग मैदानावरील चिखल व दगडमातीच्या खडबडीत ट्रॅकवर सराव करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारी नागपूरची महिला धावपटू निकिता राऊतच्या मदतीसाठी पुणेकर देवदूत धावून आले. निकिताचे टॅलेंट, जिद्द आणि मेहनतीने प्रभावित होऊन पुण्याचे शेखर द्रविड आणि सुधांशू खैरे यांनी तिला पाच वर्षांसाठी दत्तक घेतले. पुढील पाच वर्षांत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या मदतीमुळे निकिताच्या पंखाला निश्‍चितच बळ मिळणार आहे. निकिता ही एका लॉजमध्ये काम करणाऱ्या वेटरची मुलगी आहे, हे उल्लेखनीय. 

दैनिक ‘सकाळ’ने गेल्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त ‘वेटरच्या मुलीला घ्यायचीच आंतरराष्ट्रीय भरारी’ या शीर्षकाखाली राष्ट्रीय धावपटू असलेल्या निकिताची परिस्थिती व संघर्षाची कहाणी प्रसिद्ध केल्यानंतर द्रविड यांनी तिला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. स्वत: एका राष्ट्रीय धावपटूचे (सायली द्रविड) पिता असलेल्या द्रविड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी विमानाने नागपूर गाठून मुरलीनंदन नगर, वाठोडा येथील निवासस्थानी निकिता व तिच्या परिवाराची भेट घेऊन तिच्या खेळाची संपूर्ण जबाबदारी उचलत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘मी खेळाडूचा पिता असल्यामुळे मला खेळाडूच्या परिस्थितीची जाणीव आहे.

खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी सर्व स्तरांतून आर्थिक मदत व मानसिक पाठिंब्याची गरज असते. विशेषत: निकितासारख्या खेळाडूला मदत हवी आहे. खेळाडूला सर्व गोष्टी मिळाल्या तरच तो अपेक्षित ध्येय गाठू शकतो. म्हणूनच मी निकिताला तिचे स्वप्न पूर्ण करता यावे, म्हणून मदतीचा हात दिला आहे. आता निकिताने पैशाची चिंता न करता केवळ आपल्या खेळावर ‘फोकस’ करून कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवावे.’’

भविष्यात गरज पडल्यास आणखी मदत करण्याचा शब्दही जपानी कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर  असलेले द्रविड यांनी दिला. द्रविड यांनी घोषित केलेल्या आर्थिक मदतीतून निकिताला पौष्टिक आहार, क्रीडा साहित्य आणि प्रवासासाठी मोठी मदत होणार आहे. ॲथलिट खेळाडूचे पिता असलेले खैरे यांनीही निकिताला शुभेच्छा देऊन स्वप्नपूर्तीसाठी कठोर मेहनतीचा सल्ला दिला.

हुडकेश्‍वर येथील चक्रपाणी कला महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय निकिताने विपरीत परिस्थितीवर मात करीत सबज्युनियर, ज्युनियर व सीनियर पातळीवरील जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून आपल्यातील टॅलेंट जगाला दाखवून दिले. निकिताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. या मदतीमुळे तिचे स्वप्न पूर्ण साकार होईल, अशी आशा राष्ट्रीय धावपटू असलेले तिचे प्रशिक्षक रवींद्र टोंग यांनी व्यक्‍त केली. वाठोडासारख्या मागासलेल्या वस्तीत छोट्याशा ‘वन रूम किचन’ घरात राहणाऱ्या निकिताचे वडील विजय राऊत हे इतवारीतील एका लॉजमध्ये वेटर म्हणून काम करतात, तर आई कल्पना गृहिणी आहे. उशिरा रात्रीपर्यंत काम केल्यानंतर वडिलांना महिन्याकाठी जेमतेम पाच हजार मिळतात. तेवढ्या पैशात घर चालविताना त्रास होत नसल्यामुळे निकिताच्या भावालाही शिक्षण सोडून खासगी नोकरी धरावी लागली. विविध स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतील थोडाफार पैसा वाचवून ती स्वत:च्या ‘डायट’वर खर्च करते. शिवाय कुटुंबाला आर्थिक मदत करते. 

कार्यक्रमाला नागपूर जिल्हा ॲथलेटिक्‍स संघटनेचे अध्यक्ष प्रा. एल. आर. मालवीय, सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, डॉ. संजय चौधरी, निकिताचे प्रशिक्षक रवींद्र टोंग, राम वाणी, उमेश नायडू, अर्चना कोत्तेवार यांच्यासह निकिताचे कुटुंबीय व खेळाडू मित्रमैत्रिणी उपस्थित होते.

पुणेकर मदतीला धावतो, मग नागपूरकर का नाही?
गरिबीत दिवस काढणाऱ्या एका प्रतिभावान महिला धावपटूला सातशे किमी दूर अंतरावर असलेल्या व्यक्‍ती आर्थिक मदत करू शकतात, हे पाहून या देवदूतांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र, याच धावपटूसाठी नागपूर शहरातून मदतीचा हात पुढे येत नाही, ही दु:खाची बाब आहे. उपराजधानीत शेकडो कोट्यधीश क्रीडाप्रेमी व कॉर्पोरेट हाउसेस असताना गोरगरीब खेळाडूंच्या पाठीवर थाप मारणारे हात मिळत नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते.

मला दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल द्रविड सर आणि खैरे सरांचे मनापासून आभार. त्यांच्या सहकार्यामुळे मला भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी आणखी प्रेरणा मिळणार आहे. कामगिरीतील सातत्य कायम ठेवून त्यांच्या विश्‍वासाला सार्थ ठरविण्याचा मी नक्‍कीच प्रयत्न करेन. 
- निकिता राऊत, राष्ट्रीय धावपटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com