'नोबल'च्या डॉक्‍टरांनी साधली तुटलेला हात जोडण्याची किमया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

उस्मानाबाद - हातापासून तुटलेला मनगटाचा भाग जोडण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी यशस्वी केली. अशा शस्त्रक्रिया मोठ्या शहरातील रुग्णालयात केल्या जातात. मात्र, उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच ही कठीण शस्त्रक्रिया करण्यात आली.

उस्मानाबाद - हातापासून तुटलेला मनगटाचा भाग जोडण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया येथील वैद्यकीय तज्ज्ञांनी यशस्वी केली. अशा शस्त्रक्रिया मोठ्या शहरातील रुग्णालयात केल्या जातात. मात्र, उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच ही कठीण शस्त्रक्रिया करण्यात आली.

हावरगाव (ता. कळंब) येथील सुषमा कोल्हे आठ जुलै रोजी दुपारी शेतामध्ये काम करीत होत्या. या वेळी कडबाकुट्टीमध्ये त्यांचा हात सापडल्याने मनगटाचा भाग तुटून पडला. त्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात आले असता उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार होतील, असा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तत्काळ उस्मानाबाद येथील डॉ. सुधीर शिंदे यांच्या नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

डॉ. शिंदे यांनी तपासणी करीत तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. रात्री नऊ वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी पहाटे संपली. साधारण दहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत मनगटाचा भाग हाताला जोडण्याची किमया त्यांनी साधली. त्यानंतर ४८ तास रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांनी जाहीर केले. चौदा दिवसांनंतर सोमवारी (ता. २३) सुषमा कोल्हे यांना सुटी देण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. दिप्ती शिंदे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पडवळ व डॉ. किशोर कदम यांनी मोलाची मदत केली. 

शरीराचा अवयव गमावणे या विचाराने रुग्णाला मोठा धक्का बसतो. रुग्ण वेळेत उपचारासाठी दाखल झाल्यास तुटलेला अवयव जोडला जाऊ शकतो. घटना घडल्यानंतर तातडीने योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. या केसमध्येही रुग्ण वेळेत आल्यानेच शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
- डॉ. सुधीर शिंदे, प्लॅस्टिक सर्जन, नोबल हॉस्पिटल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobal Doctor broken arm connecting