नॉर्वेतील "कर्मयोगी' जपताहेत सामाजिक भान 

नॉर्वेतील "कर्मयोगी' जपताहेत सामाजिक भान 
नॉर्वेतील "कर्मयोगी' जपताहेत सामाजिक भान 

मुंबई : नशेच्या आहारी गेलेल्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नॉर्वेच्या "बॅक इन द विंग' संस्थेने सामाजिक भान जपण्याचे काम केले आहे. या संस्थेचे 11 कर्मयोगी श्रमदानातून मुंबई सेंट्रल येथे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारत आहेत. महिनाभर ही टीम काम करून पुन्हा नॉर्वेला जाणार आहे. हे काम करताना आलेले अनुभव ते इतरांना सांगणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख ऍलेक्‍झांडर मेडीन यांनी "सकाळ'ला दिली. 
भगवद्‌गीतेने ऍलेक्‍झांडर यांना प्रभावित केले. त्यातूनच ते संस्कृत भाषा शिकले आणि आता त्यांचे या भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. नैराश्‍येवर मात करण्यासाठी गीतेमधील "कर्मयोग' अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच त्यांनी व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला. यासाठी नॉर्वेत "बॅक इन द विंग' संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून नशेच्या आहारी गेलेल्यांना "योग'च्या माध्यमातून पुन्हा जगण्याचा नवा मार्ग दाखवत आहेत. ऍलेक्‍झांडर यांच्या देखरेखीखाली व्यसनमुक्त होऊन नव्याने आयुष्य जगणाऱ्या 11 जणांचे पथक अलिकडेच मुंबईत दाखल झाले आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. आपल्या कामातून इतरांना समाधान,आनंद मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यातूनच त्यांनी मुंबई सेंट्रल येथील अपना बाजार परिसरात केवळ महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यास सुरुवात केली. 

कर्मयोग्यांचा दिनक्रम 
ऍलेक्‍झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या "कर्मयोगा' थेरेपीमुळे 11 जण "कर्मयोगी' झाले आहे. हे सर्वजण सकाळी 6 ते 8 या वेळात योगा करतात. त्यानंतर 10 ते सायंकाळी 5 या वेळात ते स्वच्छतागृह उभारण्याचे काम करतात. नॉर्वे आणि मुंबईतील वातावरणामध्ये खूप फरक असल्यामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेताना त्यांची दमछाक होते; पण तरीही हे सर्वजण जिद्दीने मुंबईतल्या हवामानाशी जुळवून घेत एकामेकांना धीर देत काम करतात. खड्डा खोदणे, विटा-माती उचलणे, सिमेंट-कॉंक्रीट तयार करणे अशी विविध कामे ते करत आहेत. हे सर्वजण ऍलेक्‍झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. काम करताना थकवा वाटला की, दोघे-तिघे एकत्र येतात आणि काही क्षणांची विश्रांती घेतात. या वेळी ऍलेक्‍झांडर आणि अक्षत गुप्ता त्यांच्याशी संवाद साधला असता, या कामामुळे 11 जणांत नवचैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया ऍलेक्‍झांडर यांनी व्यक्त केली. 

रस्त्यावरील मुलांना कराटेचे प्रशिक्षण 
ऍलेक्‍झांडर यांची टीम ही मुंबईतल्या विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. या वेळी हे रस्त्यावरच्या मुलांना योगासह कराटेचेही प्रशिक्षण देतात. कराटेमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहील, असे त्यांनी सांगितले. 


11 जणांची टीम स्वच्छतागृह बांधणीचे काम करत आहे. मुंबईत महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. "बॅक इन द विंग' आणि दोन संस्था स्वच्छतागृह बांधणीचे काम करत आहेत. येथे काम करणाऱ्या 11 जणांना आपण समाजाचे देणे आहोत, ही त्यांची भावना आहे. ही भावना त्यांच्यात "कर्मयोगा'मुळे निर्माण झाली आहे. 
ऍलेक्‍झांडर मेडीन, प्रमुख, बॅक इन द विंग संस्था, नॉर्वे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com