दोन बोटं तर आहेत ना..!

परशुराम कोकणे 
शनिवार, 21 जानेवारी 2017

हाताला सगळी बोटे नसल्याने कधी कधी मी निराश होतो, पण कुटुंबातील सदस्य आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रांच्या प्रोत्साहनामुळे मी जिद्दीने शिक्षण घेतोय. मला अभियंता होऊन मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे. 
- शुभम तिरपेकर, विद्यार्थी, एस. ई. एस. पॉलिटेक्‍निक 

सोलापूर - अंगठा, करंगळी, अनामिका, मधले बोट आणि तर्जनी. दोन्ही हातांची मिळून दहा बोटं.. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये उपयोगी पडणारी. एखाद्या बोटाला लागलं तर आपण दुःख व्यक्त करत आपली कामे इतरांकडून करून घेतो.. पण तुमच्या हाताला एकच बोट असेल तर..? कधी विचार केलाय का? एस. ई. एस. पॉलिटेक्‍निक कॉलेजमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या शुभम तिरपेकर या विद्यार्थ्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला प्रत्येकी एकच बोट आहे. इतर बोटं नाहीत म्हणून शुभम खंतावत नाही. परिस्थितीवर मात करत तो आपल्या दोन्ही बोटांनी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे लिहिण्याची धडपड करतोय. 

कोनापुरे चाळीत राहणाऱ्या शुभमचे वडील संगप्पा तिरपेकर हे बी. सी. गर्ल्स हॉस्टेल येथे मजुरी करतात. शुभम दहावीला असताना आई हृदयविकाराने देवाघरी गेली. त्याच्या एका भावाचे आयटीआयचे शिक्षण झाले असून तो पुण्यात नोकरी शोधात आहे. दुसरा भाऊ सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुभमला जन्मताच दोन्ही हाताला एकेक बोट आहे. आईच्या निधनानंतर शुभम खचला होता, पण कुटुंबीयांनी त्याला साथ दिली. शुभमच्या हाताकडे पाहिल्यानंतर त्याला लिहिता येत नसेल असे आपल्याला वाटते, पण तसे नाही. 

शारीरिक अडचण असेल तर परीक्षा देताना जास्त वेळ दिला जातो, पण अडचणीवर मात करत शुभम इतर सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे लिहितो. महाविद्यालयातून घरी गेल्यावर वडिलांना घरकामात मदतही करतो. आयुष्यात अडचण असतानाही तो आनंदाने जीवन जगतोय. त्याच्या जिद्दीला सलाम करायला हवा असे त्याला नेहमी प्रोत्साहन देणारे प्रा. विक्रमसिंह बायस यांनी सांगितले. 

हाताला सगळी बोटे नसल्याने कधी कधी मी निराश होतो, पण कुटुंबातील सदस्य आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रांच्या प्रोत्साहनामुळे मी जिद्दीने शिक्षण घेतोय. मला अभियंता होऊन मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे. 
- शुभम तिरपेकर, विद्यार्थी, एस. ई. एस. पॉलिटेक्‍निक 

Web Title: only two fingers, he faced examination