शेतकऱ्यांना मिळणार सेंद्रीय शेतीचे धडे 

नंदिनी नरेवाडी
सोमवार, 1 जुलै 2019

कोल्हापूर - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रीय पद्धतीने उपलब्ध जागेनुसार "न्युट्रीशन गार्डन' चा अभ्यासक्रम सुरू झाला असून कागल तालुक्‍यातील शेंडूर येथे 100 कुटुंबांना याचे 19 मे पासून मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्रातर्फे पोषणमुल्यावर आधारित शेतीपद्धती योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण सुरू आहे

कोल्हापूर - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रीय पद्धतीने उपलब्ध जागेनुसार "न्युट्रीशन गार्डन' चा अभ्यासक्रम सुरू झाला असून कागल तालुक्‍यातील शेंडूर येथे 100 कुटुंबांना याचे 19 मे पासून मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्रातर्फे पोषणमुल्यावर आधारित शेतीपद्धती योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण सुरू आहे. कृषि विज्ञान केंद्राची सात जणांची टीम यासाठी गावात जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देते. येणाऱ्या काळात चंदगड, आजरा, भुदरगड, कागल, करवीर व गडहिंग्लज तालुक्‍यातही अशाच पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

शेतकऱ्यांना विशेषतः महिलांना उपलब्ध जागेत सेंद्रीय पद्धतीने परसबाग फुलविण्याचे प्रशिक्षण याअंतर्गत देण्यात येते. यात 20 गुंठे ते 1 एकर जागेत मोठी परसबाग ज्यात वड, पिंपळ, औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेली अशांची लागवड करता येऊ शकते. 5 गुंठे जागेत मध्यम स्वरूपाची बाग, दीड गुंठे ते 5 गुंठे जागेत हंगामी भाजीपाला, फळभाज्यांची कशी लागवड करावी, याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाते. तसेच टेरेसवर कमी जागेत जास्त भाजीपाला कसा पिकवायचा याचेही प्रात्यक्षिकासोबत प्रशिक्षण दिले जाते.

परसबागेची निवड कशी करावी, जमिनीची तयारी, खत व पाण्याचे व्यवस्थापन कसे असावे, भाजीपाला पिकवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, भाजीपाला, फळभाजी, विविध वेलवर्गीय भाज्यांची लागवड कशी करावी, ऋतुमानानुसार कोणकोणत्या भाज्या घ्याव्यात यांबाबतचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमात केले जाते. विशेषतः महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देताना त्यांना कोणती झाडे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. याचीही माहिती त्यांना दिली जाते. जेणेकरून कुंटुबातील प्रत्येकाचे आरोग्य निरोगी राहिल. 

बाजारपेठेचीही उपलब्धतता 
भाज्यांची लागवड करताना जीवामृत, सेंद्रीय खत, गांडूळ खत कसे तयार करावे याचेही प्रशिक्षण दिले जाते. घरच्या घरी कंपोस्टिंग करून ते खत या बागेत वापरले जाते. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला हा भाजीपाला पुन्हा कृषि विज्ञान केंद्राकडून बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाते. शिवाय रास्त दराने हा भाजीपाला खरेदी केला जातो. 

शेतकऱ्यांना विशेषतः महिलांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्रातर्फे दिले जाते. शेंडूर गावातील 25 शेतकऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले जात असून येणाऱ्या काळात आणखी 100 कुटुंबे व शहरातही याचे प्रशिक्षण दिले जाईल. 
- प्रतिभा ठोंबरे
, विषय विशेषज्ञ,गृह विज्ञान. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: organic farming training from Sidhagiri Krishi Vigyan Kendra