सॅनिटरी नॅपकिनपासून खतनिर्मिती

नंदिनी नरेवाडी
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

बागकामाबरोबरच कंपोस्टिंगची आवड असल्याने सॅनिटरी नॅपकिनचीही विल्हेवाट लावता येईल, असा विचार केला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळेत याची माहिती मिळवली. सहा वर्षांपासून मी घरातच सॅनिटरी नॅपकिनपासून सेंद्रिय खत तयार करीत आहे. 
- नैना साळोखे

कोल्हापूर - सॅनिटरी नॅपकिनमुळे दिवसेंदिवस पर्यावरणासाठी धोका वाढत आहे. यासाठी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. न्यू पॅलेस परिसरातील नैना साळोखे यांनी सॅनिटरी नॅपकिनपासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे घरच्या घरी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावता येणे शक्‍य झाले आहे.

अशा खतनिर्मितीसाठी साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन झाल्यास त्याची दुर्गंधी पसरत नाहीत. तसेच अळ्या, किडेही होत नाहीत. या खताचा वापर फुलझाडे व फळझाडांना उपयोग होतो आहे.

गोखले कॉलेजमध्ये बागकामाच्या अभ्यासक्रमावेळी नैना यांना बागकामाची आवड लागली. त्यातून त्यांनी घरच्या घरी स्वयंपाकघर आणि बागेतील कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू केली. त्यातून कंपोस्टिंगच्या विविध पद्धती वापरू लागल्या. सॅनिटरी नॅपकिनचेही काही प्रमाणात विघटन होऊ शकत असल्याने त्यापासूनही खतनिर्मिती होईल, अशी संकल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातील एका कार्यशाळेत सॅनिटरी नॅपकिनपासून खतनिर्मितीची माहिती घेतली.

सुरवातीला दोन वेळा पद्धत चुकल्याने त्यांचा हा प्रयोग फसला; पण त्यांनी योग्य व्यवस्थापन करत सॅनिटरी नॅपकिनपासून खतनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. सध्या त्यांच्या बागेत त्या स्वयंपाकघरातील कंपोस्ट खतासोबत या खताचाही वापर करतात.

असा आहे प्रयोग 
तीन चार छिद्रे असणाऱ्या कुंडीत नारळाच्या शेंड्या घालायच्या. त्यावर वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्समधील प्लास्टिक बाहेर काढून दाबायचे. त्यावर वाळवलेली चहाची पावडर, फळांच्या साली, अंड्याच्या कवचाची बारीक पूड, स्वयंपाकघरातील कचरा घालून हवाबंद करून ठेवायचा. दोन महिन्यांनंतर त्याचे विघटन होऊन खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. चार महिन्यांनंतर एकजीव होऊन सेंद्रिय खत तयार होते.

विनाकुंडीच्या झाडांची बाग 
नैना साळोखे यांनी बाल्कनी गार्डन, टेरेस गार्डनसोबतच विनाकुंड्याची झाडेही बागेत लावली आहेत. त्यांच्या बागेत सध्या दोनशे प्रकारची झाडे फुलली असून त्या विविध रोपेही तयार करतात. बागेत विविध दुर्मिळ फुलझाडांपासून निवडुंगाचे कलेक्‍शनही आहे.

बागकामाबरोबरच कंपोस्टिंगची आवड असल्याने सॅनिटरी नॅपकिनचीही विल्हेवाट लावता येईल, असा विचार केला. त्यानंतर  शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळेत याची माहिती मिळवली. सहा वर्षांपासून मी घरातच सॅनिटरी नॅपकिनपासून सेंद्रिय खत तयार करीत आहे. 
- नैना साळोखे

Web Title: organic manure preparation from sanitary napkin