कव्वालीतील पैशांची झोळी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना

अमित गवळे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. 

पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. 

दर्ग्यात झालेल्या कार्यक्रमात सर्व, जाती, धर्म, पंथांसह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक  सहभागी झालेले होते. त्यामुळे पालीत यानिमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी दर्ग्यात फुलांची चादर समर्पित करुन प्रार्थना केली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पालीतील हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्याशेजारी कव्वालीचा जंगी मुकाबला पार पडला. सुप्रसिध्द गायक सहिद फरीद निजामी व सुप्रसिध्द गायिका गझलफेम हिना वारशी यांच्या मधूर वाणीतून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.

हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्याचे भोपी उस्मान मुजावर यांच्या निवासस्थानापासून फुलांनी सजवलेली संदल धार्मिक वातावरणात काढण्यात आली. बाजारपेठेतून मार्गक्रमण होत निघालेली संदल शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात, तेथून पुढे आगर आळीतील कुलूस पीर बाबा येथे जावून पुढे पिराचा माळ येथील मुल्लाखानसाहेब यांच्या दरबारात जाऊन सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते वसंत ओसवाल, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, भाजप नेते विष्णू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या गीता पालरेचा, भाजप जिल्हा चिटणीस राजेश मपारा, शिवसेना नेते रशाक मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा मुख्य संघटक अनुपम कुलकर्णी, रिपाइं सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, ताराराणी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष वंदना मोरे, पाली तहसीलदार बी.एन. निंबाळकर, आब्बास बेणसेकर, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरिफ मनियार, सुलतान बेणसेकर, इमदाज पठाण, आदिसंह मान्यवर, ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुरुस कमिटी व मुस्लिम समाज पाली यांनी मेहनत घेतली.

Web Title: In Pali Kavvali Money for the martyrs family