गणेश मंडळाचे कार्यकर्ते बनले अपंग प्राचीचे पाठबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सामाजिक दायित्वातून मंडळाकडून व्हीलचेअरची भेट
पिंपरी - आपण ज्या समाजात राहून स्वतःची प्रगती करतो, त्या समाजाला उत्तरदायित्व म्हणून परतफेड करणारे एसकेएफ कॉलनी गणेश मित्रमंडळ निराळेच म्हणावे लागेल. विसर्जनावर अधिक खर्च न करता मंडळाने एका गरीब कुटुंबातील अपंग मुलीला व्हीलचेअर देऊन तिला जगण्याचे बळ दिले आहे. 

सामाजिक दायित्वातून मंडळाकडून व्हीलचेअरची भेट
पिंपरी - आपण ज्या समाजात राहून स्वतःची प्रगती करतो, त्या समाजाला उत्तरदायित्व म्हणून परतफेड करणारे एसकेएफ कॉलनी गणेश मित्रमंडळ निराळेच म्हणावे लागेल. विसर्जनावर अधिक खर्च न करता मंडळाने एका गरीब कुटुंबातील अपंग मुलीला व्हीलचेअर देऊन तिला जगण्याचे बळ दिले आहे. 

कॉलनीतील गणेशोत्सवाचा वर्गणीरुपी आर्थिक भार कोणावरही लादायचा नाही, हे कार्यकर्त्यांचे धोरण आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून आपापसांत पैसे गोळा करून गणेशोत्सव साजरा करतात. विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक कार्यक्रम, ढोल-ताशाच्या संगतीतील भव्य विसर्जन मिरवणूक अशी खर्चाची जबाबदारीही हे कार्यकर्तेच उचलतात. मात्र, यंदाची वर्गणी एखाद्या गरजूला देऊन सत्कारणी लावण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. त्यासाठी गणेशोत्सव काळातील कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकीवरील खर्चात कपात करण्याचे त्यांनी ठरविले. 

चिंचवड गावातील वेताळनगरमध्ये राहणाऱ्या प्राची कदम या मुलीविषयी त्यांना माहिती मिळाली. दोन्ही पायाने अधू असलेली प्राची चिंचवडगावातील महापालिका शाळेत नववीमध्ये शिकते. तिचे वडील हयात नसल्याने तिची आजीच मोठ्या कष्टाने तिचा सांभाळ करते. प्राचीला शाळेत उचलून आणण्याची आणि नेण्याची जबाबदारीही आजीच पार पाडते. त्यामुळे सर्वप्रथम प्राचीला स्वावलंबी बनविणे कार्यकर्त्यांना गरजेचे वाटले. त्यातूनच त्यांनी तिला व्हीलचेअर देण्याचा निर्णय घेतला. तिला कॉलनीमध्ये बोलावून समारंभपूर्वक व्हीलचेअर भेट दिली. या अनोख्या भेटीने प्राची आणि तिची आजीही भारावून गेली. ‘‘या व्हीलचेअरमुळे मी आता स्वावलंबी बनेल,’’ अशी भावनाही तिने व्यक्‍त केली.  मंडळाचे अध्यक्ष मनीष महामुनी यांच्यासह प्रवीण कुलकर्णी, रणधीर पवार, मंगेश वैद्य या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news handicaped prachi support by ganesh mandal