पोलिसांनी स्वीकारले वधूचे पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

सरळगाव - मुरबाड पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचे छायाछत्र नसलेल्या मुलीचे पालकत्व स्वीकारून मुरबाड पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तिचे वडिलकीच्या नात्याने चक्क लग्न लावून दिले. पोलिसांनी दाखवलेल्या या प्रेम आणि माणुसकीमुळे त्यांचे कौतुक होत असून या मुलीचे कन्यादान आमदार किसन कथोरे यांनी स्वतः उपस्थित राहून केले.    

मुरबाड पोलिस ठाण्यात रूपाली भगवान पवार (रा. राहुरी, जि.नगर) ही पोलिस कर्मचारी म्हणून काम करत आहे. वडिलांचा मृत्यू झाल्याने आपल्या लग्नाचे कोण पाहणार, लग्न कसे होणार; या विवंचनेत ती होती. त्यातच विवाह योग जुळून आला आणि पिंपळगाव येथील प्रवीण बारकू पवार याच्यासोबत तिचे लग्न ठरले; मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लग्न थाटामाटात करता येणार नाही हे दु:ख पचवत त्यांनी लग्न नोंदणी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. याची कुणकुण लागताच उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे आणि मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्यातील बाप जागा झाला. त्यांनी पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या मुलीचे स्वतःच्या मुलीप्रमाणे 

थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला. याला पाठिंबा दर्शवत पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक एक जबाबदारी उचलली. 

रविवारी (ता. २९) नमस्कार हॉलमध्ये धूमधडाक्‍यात मुलीचे लग्न झाले. वधूच्या मामांची जबाबदारी पोलिस कर्मचारी महादेव खोमणे यांनी स्वीकारून त्यांनी वधूला कडेवर उचलून लग्न मंडपात आणल्यावर मंडपातील प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. या वेळी पोलिस उपनिरीक्षक सुवास खरमाटे पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष जयंत सूर्यराव, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, माजी नगराध्यक्ष वैभव भोसले, वैश्‍य समाज संघाचे अध्यक्ष सुधीर तेलवणे व अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police guardian's guardianship