अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 2 मे 2018

किरणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण गावातीलच सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात व पदवीपर्यंतचे शिक्षण आदर्श कला महाविद्यालयात पूर्ण झाले.

निजामपूर-जैताणे (धुळे) :माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील एका गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व कठोर परिश्रमाने पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गावातील माळी समाजातील पहिला पीएसआय होण्याचा मान मिळवला आहे. ही यशोगाथा आहे खुडाणे येथील किरण देविदास शेवाळे यांची. खरं तर किरणला शिक्षक व्हायचे होते. पण व्हाया 'एसआरपीएफ' मधील 'जवान'मार्गे तो झाला 'फौजदार..!'

किरणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण गावातीलच सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात व पदवीपर्यंतचे शिक्षण आदर्श कला महाविद्यालयात पूर्ण झाले. त्याने इंग्रजी विषय घेऊन पदवी संपादन केली. शेतीची कामे करून व खुडाणे ते निजामपूर-जैताणे येथे बसने ये-जा करून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले..!

त्यांनतर सन २०१० मध्ये त्याची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-१, पुणे येथे पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. त्यानंतर त्याने सन २०१० ते २०१७ पर्यंत 'एसआरपीएफ'मध्ये पुण्यात पोलीस शिपाई म्हणून नोकरी केली. परंतु त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहून नेहमी आपणही मोठे अधिकारी व्हावे, नेतृत्व करावे असे वाटायचे. त्यातच त्याने नोकरी सांभाळून मेहनतीने पहिल्या टप्प्यातील खात्यांतर्गत पीएसआय पदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्णही झाला. त्याने शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न साकार करून व गावातील माळी समाजातील पहिला पीएसआय होण्याचा मान मिळवून खुडाणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या किरण नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पीएसआय पदाचे प्रशिक्षण घेत असून तेथून परतल्यावर त्याचे गावातर्फे भव्यदिव्य स्वागत व सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच प्रतिनिधी पराग माळी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली..!

किरणचे वडील देविदास परशराम शेवाळे अल्पशिक्षित शेतकरी असून आई प्रमिलाबाई देविदास शेवाळे अशिक्षित गृहिणी आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला चार एकर कोरडवाहू शेतजमीन होती. परंतु नापिकीमुळे शेतीतून उत्पन्न येत नव्हते. अशातच मुलाला नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी काबाडकष्ट करून नुकतीच दोन वर्षांपूर्वी शेती बागायत केली आहे. आईवडिलांसह लहान भाऊ शेती सांभाळतो. त्याला एक विवाहित बहीणही आहे. किरणची पत्नी संगीता शेवाळे हिचेही डी.एड.पर्यंत शिक्षण झाले असून त्यांना कार्तिक नावाचा दीड वर्षाचा मुलगाही आहे. किरणने आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबियांसह आपल्या गुरुजनांना दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्पर्धा परीक्षांमध्ये हिमतीने पुढे गेले पाहिजे असे आवाहन त्यांनी युवकांना केले आहे..!
 

Web Title: police inspector became the farmer's son