कीर्तनातून समाजसुधारणेची "वर्दी' 

पांडुरंग सरोदे
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा दूर करण्याबरोबरच संत परंपरेचा आधार घेत एक पोलिस अधिकारी सध्या कीर्तन, प्रवचनातून समाज परिवर्तन करण्याचे काम करत आहे. पोलिस उपनिरीक्षक रमेश वेठेकर असं त्यांचं नावं. 

अखंड हरिनाम सप्ताह असो किंवा दशक्रिया विधी. वेठेकरांचे कीर्तन, प्रवचन ठरलेलेच ! दैनंदिन काम संपल्यानंतर संत, महापुरुषांच्या विचारांपासून ते सध्याच्या ज्वलंत प्रश्‍नांवर समाजाला जागृत करण्याचे काम ते करत आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक गावांना त्यांनी समाजसुधारणेचा मार्ग दाखविला आहे. 

वेठेकर हे मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्‍यातल्या छोट्याशा पारगावचे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते पोलिस दलात दाखल झाले. वडिलांमुळे घरी आध्यात्मिक वातावरण होते. त्यांच्याच गावचे सद्‌गुरू पांडुरंगदादा मडके यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन, प्रवचनाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतरच त्यांनी गावोगावी जाऊन कीर्तन, प्रवचन देण्यास सुरवात केली. आतापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रातील असंख्य गावांना त्यांनी संत परंपरा, महापुरुषांचे कार्य समजावून सांगतानाच वाममार्गापासून परावृत्त होण्याचा संदेश दिला. वेठेकर हे सध्या राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या घातपातविरोधी तपासणी विभागात कार्यरत आहेत. 

टाळ, मृदंगाच्या आवाजात अक्षरशः हरवून जात प्रबोधन करणाऱ्या वेठेकरांना अनेक गावांमधील अखंड हरिनाम सप्ताहांना आवर्जून निमंत्रण दिले जाते. 

पहाटे तासभर ध्यानधारणा, सव्वासहा वाजता पोलिस परेड, त्यानंतर पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना योगा, प्राणायामाचे प्रशिक्षण देणे, ज्ञानेश्‍वरी व अवांतर वाचन, कामाची वेळ संपल्यानंतर घरी ग्रंथवाचन किंवा आमंत्रण असेल तेथे कीर्तन, प्रवचन अशा स्वरूपाचा वेठेकर यांचा दिनक्रम आहे. प्रबोधिनीचे विशेष पोलिस महासंचालक चंद्रकांत दैठणकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेठेकरांना प्रोत्साहन दिले जाते. संस्कृत, प्राकृत भाषांच्या काही प्रमाणातील अभ्यासामुळे ते एखादी गोष्ट नागरिकांना सहज पटवून देतात. आठ वर्षांपासून सुरू असलेला या आध्यात्मिक प्रवासामुळे दैनंदिन काम करण्यासही अधिक बळ मिळत असल्याची भावना वेठेकर यांनी व्यक्त केली. 

वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर कुटुंबांची जबाबदारी आईवर आली. तिने आम्हा भावंडांवर योग्य संस्कार केले. त्याचवेळी माझ्या गुरूंनी देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. पुढे पोलिसामध्ये दाखल झालो. पोलिस समाजासाठी अहोरात्र झटत असूनही लोकांच्या मनात त्यांच्याविषयी नकारात्मक भावना आहे. माझ्या कीर्तन, प्रवचनाद्वारे हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी करतो. संत साहित्याच्या आधारे व्यसने, भ्रष्टाचार, समाजामध्ये वाढणारी तेढ आणि अन्याय- अत्याचाराविरुद्ध रोखठोक भूमिका मांडतो आणि नागरिकही ते स्वीकारतात. 
- रमेश वेठेकर, पोलिस उपनिरीक्षक आणि कीर्तनकार 

Web Title: Police inspector Ramesh vethekara shown by way of social reform