पोंगे विक्रेत्याचा मुलगा बनला संशोधन सहाय्यक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

स्वतःच्या क्षमतांवर खरे उतरल्याचा मनस्वी आनंद आहे; परंतु हे यश माझ्या एकट्याचे नसून सर्व मित्र व माझ्या कुटुंबाचे आहे. यापुढे राष्ट्रहितासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची इच्छा असून, समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. 
- मनोहर नेरकर 
 

पार्टटाइम नोकरी करून नामपूरच्या मनोहरची गरुडभरारी 
नामपूर : ग्रामीण भागात करिअरसाठी कधी भटकंती करत, तर कधी वडिलांच्या पोंगे विक्री व्यवसायाला हातभार लावत शिक्षणासोबत पार्टटाइम नोकरी करत मनोहर नेरकरने जिद्दीने राज्याच्या संशोधन सहाय्यकपदी यश मिळविले. येथील इंदिरानगर परिसरातील कारभारी नेरकर यांचा पोंगे विक्रीचा व्यवसाय आहे. 
दिवसभर खेडोपाडी पोंगे विकून घराचा उदरनिर्वाह भागवायचा. अशा आव्हानात्मक, आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत कारभारी नेरकर यांनी मुलाला शिक्षणासाठी नाशिकमध्ये पाठविले. शहरात आल्यावर आपल्या परिस्थितीला न परवडणारे शिक्षण लक्षात घेऊन मनोहरने औषधाच्या दुकानात पार्टटाइम नोकरी केली. शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासदेखील सुरू ठेवला. दोन-तीन वेळा यशाने हुलकावणी दिली. मात्र, हार न मानता अभ्यास सुरूच ठेवला. अखेर प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर मार्च 2016 मध्ये "आयबीपीएस'तर्फे झालेल्या "संशोधन सहाय्यक वर्ग-2 अराजपत्रित' या पदासाठी मनोहरची खुल्या प्रवर्गातून निवड झाली. विशेष म्हणजे, या विभागातील 51 पैकी केवळ पाच जागा "संशोधन सहाय्यक' या पदासाठी होत्या. 
मनोहरने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण नामपूर येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे व पुढे एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील बीवायके महाविद्यालयात पूर्ण केले. त्याच्या यशाचे श्रेय त्याने आपले वडील कारभारी नेरकर व आई वंदना यांना दिले. मनोहरचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असल्याने त्याला अनेकांचे सहकार्य मिळत गेले. या सर्व व्यक्तींमुळेच हे यश प्राप्त करू शकलो, असे तो सांगतो. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, संदीप शिरसाठ, मुकेश बाविस्कर, कैलास चौधरी, मनोज दशपुते, राजू पठाण, कुणाल पवार, विशाल अहिरे आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. 

स्वतःच्या क्षमतांवर खरे उतरल्याचा मनस्वी आनंद आहे; परंतु हे यश माझ्या एकट्याचे नसून सर्व मित्र व माझ्या कुटुंबाचे आहे. यापुढे राष्ट्रहितासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची इच्छा असून, समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. 
- मनोहर नेरकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ponge vikreta son scientist